‘पुरुषां’च्या शिवकृ पा बचत गटाकडून नव्या पॅटर्नचीनिर्मिती

By Admin | Updated: January 15, 2015 23:30 IST2015-01-15T21:57:01+5:302015-01-15T23:30:00+5:30

--आधारवड--पुरुषांचा बचत गट असणे येथे दुर्मीळ. मात्र, ही किमया शिवकृपा महाबचत गटाने साध्य केली

Creating new patterns from 'Shiva Paa Sav group' of men | ‘पुरुषां’च्या शिवकृ पा बचत गटाकडून नव्या पॅटर्नचीनिर्मिती

‘पुरुषां’च्या शिवकृ पा बचत गटाकडून नव्या पॅटर्नचीनिर्मिती

शुन्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता कोकणी माणसामध्ये आहे, हे सिद्ध झाले आहे. साडेपाच वर्षात १५ बचत गटांची निर्मिती करुन सर्वांपुढे आदर्श उभा करण्याचा महादेव पोरे यांनी प्रयत्न केला आहे. सुरुवातीला कर्ज देताना मागे पुढे पाहणाऱ्या बँकांनीच नंतर अशा बचतगटांना सहकार्य करण्याचे धोरण स्विकारले आहे. त्याचाच अनुभव शिवकृपा बचत गटाला आला आहे. सुमारे आठ कोटीचे अर्थसहाय्य दिल्यानंतर महाबचत गटात रुपांतर झालेल्या शिवकृपाने पुरुषांनी एकत्र येऊन केलेल्या नव्या पॅटर्नची निर्मिती केली आहे.-पुरुषांचा बचत गट असणे येथे दुर्मीळ. मात्र, ही किमया शिवकृपा महाबचत गटाने साध्य केली आहे. बँकांतर्फे बचत गटांना अर्थसहाय्य देण्यात येत असले तरी वेळोवेळी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र, काही ठिकाणी अपवाद आहेच. या भागात १५ बचत गटांचे काम सुरळीत असल्याने त्याद्वारे विकासविषयक उपक्रमामध्ये पुढाकार घेता येतो. गावासाठी ही गोष्ट नेहमीच भूषणावह ठरली आहे. या बचत गटामार्फत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न सुरु आहे.

‘विना सहकार नाही उध्दार’, या उक्तिचा प्रत्यय शिवकृपा महाबचत गटाची वाटचाल पाहता आल्यावाचून राहात नाही. अल्प शिक्षण तसेच अन्य आवश्यक बाबींचा अभाव असल्याने कोणतीही बँक कर्ज देत नाही, याची सल सातत्याने बोचत असे. त्यामुळे आंब्याच्या झाडाखाली बसलो असताना पुरूषांचा बचत गट स्थापन करावयाचे ठरविले.
शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून महादेव कोरे यांनी शिवकृपा बचत गटाची स्थापना केली. एक बचत गट चालवताना येणाऱ्या अडीअडचणी किंवा समस्यांची जाण संबंधितांना आहे. मात्र, कोरे यांनी गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीत १३ पुरूषांचे, तर २ महिलांचे मिळून एकूण १५ बचत गट स्थापन केले. आज शिवकृपा बचत गटाचे रूपांतर महाबचत गटामध्ये झाले आहे.
१५ बचत गटांमध्ये ३०० सभासद असून, संबंधित बचत गटातील सभासदांकडून प्रत्येकी ५०० रूपये मासिक रक्कम गोळा केली जाते. बँकेमध्ये खाते काढण्यात आले असून, त्यामध्ये पैसे दरमहा जमा केले जातात. सहा महिन्यांनंतर सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो. संबंधित सभासदाची क्षमता, परतफेडीची शाश्वती पाहून दीडपट कर्जपुरवठा करण्यात येतो. संबंधित सभासदांना बँकेमार्फत कर्ज पुरवठा करून देण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाते. पोकलेन, ट्रॅक्टर, जेसीबी, डंपर सभासदांना विकत घेणे सोपे झाले आहे. त्यामुळे १५ बचत गटांचे काम सुरळीत सुरू आहे. वैनगंगा कृष्णा बँकेव्दारे संबंधित महाबचत गटाला आतापर्यंत ७ ते ८ कोटीचे कर्ज देण्यात आले आहे. आतापर्यंत सर्व सभासदांकडून कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्यात येत आहेत. संबंधित बचत गटांचे काम सुरळीत व सुयोग्य सुरू असल्यानेच वैनगंगा-कृष्णा बँकेचे अध्यक्ष कुमार तांबे यांच्या हस्ते महादेव कोरे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
शासनाच्या बचत गट योजनेचा लाभ घेत बचत गटातील प्रत्येक सभासदाला स्वत:चा व्यवसाय वृध्दिंगत करण्यात यश मिळविले आहे. कोरे यांच्या बचत गटात बांधकाम कारागिरांचाही समावेश आहे. सभासदांच्या भविष्याचा विचार करता प्रत्येक सभासदासाठी विमा संरक्षण योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. शिवकृपा महाबचत गटअंतर्गत १५ बचत गटांना केवळ क्रमांक देण्यात आला आहे. पुरूषांचे १३ व महिलांच्या २ बचत गटांचे कामकाज अतिशय चांगल्या पध्दतीने सुरू असून, त्याचे श्रेय सर्व सभासदांनाच असल्याचे कोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शिवकृपा बचत गटाने आता स्वयंप्रेरणेने सहभागी बचतगटांना व्यवसायासाठी उद्युक्त केल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह व गावचा विकास झाला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेकांनी अशा स्वरुपाचे बचतगट तयार केल्यास त्यातून छोटे छोटे व्यवसाय निर्माण होऊन हाताला काम मिळेल व आर्थिक समृद्धी घरी येईल. हा समृद्धीचा नवा मंत्र या बचत गटाने दिला आहे.
- मेहरुन नाकाडे

Web Title: Creating new patterns from 'Shiva Paa Sav group' of men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.