स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळाची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST2021-06-29T04:22:03+5:302021-06-29T04:22:03+5:30
राजापूर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना निसर्गसौंदर्याचा वारसा लाभला आहे. येथील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह अन्य विकास ...

स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळाची निर्मिती करा
राजापूर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना निसर्गसौंदर्याचा वारसा लाभला आहे. येथील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह अन्य विकास झाल्यास त्यातून पर्यटनाला अधिक चालना मिळेल. त्यातून, रोजगार निर्मिती होऊन अनेक कुटुंबांना आर्थिक स्तर उंचावण्याची संधी प्राप्त होईल. त्यामुळे पर्यटकांसह पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सोयी - सुविधा निर्माण करण्याकरिता स्वतंत्र कोकण पर्यटन विकास मंडळ स्थापन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे चिटणीस अजित यशवंतराव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तळकोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हे जिल्हे नैसर्गिक विविधतेने नटलेले आहेत. तर कोकणाला सुमारे ७२० किलाेमीटर लांबीचा समुद्रकिनाराही लाभलेला आहे. कोकणाला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला असून, अनेक ऐतिहासिक गड - किल्ले, पुरातन लेणी, हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पे आजही अस्तित्वात आहेत. कोकणामध्ये देव - देवतांना अनन्यसाधारण महत्त्व असून, येथील पवित्र देवस्थाने आणि तीर्थक्षेत्र प्रसिध्द आहेत. कृषी पर्यटनाचा विचार केला असता, फळांचा राजा असलेला हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. याठिकाणी हापूस आंब्यासह, काजू, फणस, नारळी-पोफळी आदींच्या मोठ्या प्रमाणावर बागा आहेत. हे सर्व निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक ठेवा पर्यटकांचे नेहमीच लक्ष वेधून घेतो. तेथील वाढणाऱ्या पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी याठिकाणी चांगले रस्ते वा अन्य पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. ते झाल्यास याठिकाणी जगभरातील पर्यटक येऊन येथील पर्यटन विकास आणि व्यवसायाला चालना मिळेल अन् त्यातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होऊन अनेक कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
--------------------------
दृष्टीक्षेपात कोकण
- कोकणाला लाभलेले अलौकिक आणि अनोखे निसर्गसौंदर्य
- ७२० किलाेमीटरचा समुद्रकिनारा
- ऐतिहासिक आणि धार्मिक ठेवा
- मानवाची हजारो वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पे
- इतिहासकालीन गड-किल्ले