अंजनवेलमध्ये भ्रष्टाचार

By Admin | Updated: October 2, 2015 23:23 IST2015-10-02T23:23:23+5:302015-10-02T23:23:37+5:30

गुहागर तालुका : नगरसेवक मयुरेश कचरेकर यांचा आरोप

Corruption in Anjanvel | अंजनवेलमध्ये भ्रष्टाचार

अंजनवेलमध्ये भ्रष्टाचार

गुहागर : अंजनवेल ग्रामसचिवालय तळमजला व पहिला मजला बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याचे कागदोपत्री पुरावे जोडत माहिती अधिकारात मिळत असलेल्या कागदपत्रांवरुन या ग्रामपंचायतीमध्ये मागील पंधरा वर्षात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमीतता दिसून येत आहे. या ग्रामपंचायतीचे मागील पंधरा वर्षांचे विशेष लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी मयुरेश कचरेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. नगरसेवक मयुरेश कचरेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विनायक मुळ्ये यांनी या तक्रारीमधील विविध मुद्द्यांबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.
ग्रामपंचायत सचिवालयाची निविदा फक्त मर्यादित ठिकाणी प्रसिद्ध करुन ओम साई कन्स्ट्रक्शन यांना ते शासकीय ठेकेदार नसतानाही हे काम दिले गेले. या कामाचा कार्यारंभ आदेश ३० जानेवारी २००९ रोजी दिल्यानंतर लगेचच तीन दिवसात २ फेब्रुवारीला ८ लाख रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले. यानंतर गुहागर पंचायत समितीचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे तत्कालीन कनिष्ठ अभियंता यांनी आपल्या आर्थिक अधिकारात येत नसलेली बिन तारखेची आठ लाख, सात लाख व चार लाख अशी तीन रंनिंग मुल्यांकने दिल्याचे कागदोपत्री दिसत आहे. तळमजला बांधकामाच्या तांत्रिक मान्यतेवर खाडाखोड करुन उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या बनावट सह्या केलेल्या दिसत आहेत. पहिल्या मजल्याचे अंदाजपत्रक नसतानाही बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. लेखा परीक्षणामध्ये याबाबत आक्षेप नोंदवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
पहिल्या मजल्याची निविदा प्रक्रिया दि. ५ जुलै ते २० जुलै २००९ च्या कालावधीत केलेली दिसत आहे. या अंदाजपत्रकावर उपअभियंता म्हणून सही केलेली व्यक्ती गुहागरात १ मार्च २०१३ ला हजर झाली आहे. तळमजला व पहिला मजला ही दोन स्वतंत्र कामे असतानाही देयके एकत्रीतपणे बेकायदेशीर पद्धतीने दिली गेली आहेत. तळमजला अंदाजपत्रक २४ लाख ९९ हजार २७७ रुपये असताना ठेकेदारास बेकायदेशीर ३७ लाख रुपये दिले गेले. याची ३० जून २०११ च्या मासिक सभेमध्ये ठराव क्र. ६ मध्ये नोंद आहे. सन २००६ ते २०१० लेखा परीक्षणामध्ये आक्षेप असतानाही सरपंच यशवंत बाईत यांनी स्वत:च्या आर्थिक लाभाकरिता एकूण सहा व्हाऊचरद्वारे कोणतेही मुल्यांकन नसताना १३ लाख २५ हजार रुपये ठेकेदारास बेकायदेशीरपणे दिले आहेत. याबाबतही लेखा परीक्षण अहवालात नोंद घेण्यात आली आहे.
या कामाची एम. बी. रेकॉर्डवर जाणीवपूर्वक तारीख न टाकता दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांवरुन सन २०१० ते २०१२ या दोन वर्षाचे ३० एप्रिल २०१३ चे आॅडिटनुसार तळमजल्यासाठी २४ लाख व पहिल्या मजल्यासाठी २३ लाख २५ हजार असे एकूण ४७ लाख २५ हजार खर्च झालेला असताना दोन्ही मिळून ५० लाख २५ हजार रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आली आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Corruption in Anjanvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.