"पहिल्या डोसचं प्रमाणपत्र नाही; मोबाईल नंबरही लक्षात नाही... काय करायचं?"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 09:59 IST2021-06-30T04:20:57+5:302021-06-30T09:59:06+5:30
रत्नागिरी : सध्या लसीकरणाला वेग आला आहे. आता तर १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींनाही लसीकरण सुरू झाले आहे. ...

"पहिल्या डोसचं प्रमाणपत्र नाही; मोबाईल नंबरही लक्षात नाही... काय करायचं?"
रत्नागिरी : सध्या लसीकरणाला वेग आला आहे. आता तर १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींनाही लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, काहींना पहिल्या डोसचेच प्रमाणपत्र न मिळाल्याने अशांना दुसरा डोस घेताना अनेक अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात तर ही समस्या अधिकच येत आहे.
सध्या लसीकरणाला अधिक गती आली आहे. सध्या १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींनाही लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, काहींनी पहिली लस घेतली आहे, अशांची अद्याप प्रमाणपत्रेच काही ठिकाणी अपलोड न झाल्याने अशांना दुसऱ्या डोससाठी जाताना अडचणीचा सामना करावा लागतो. दुसरा डोस घेण्यासाठी पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र ऑनलाइन दिसले तरच दुसरा डोस दिला जातो. परंतु काही वेळा पहिला डोस घेऊन अनेक दिवसांचा कालावधी गेला तरी प्रमाणपत्र अपलोड झालेले नसते. ग्रामीण भागामध्ये ही समस्या अधिक जाणवत आहे.
काही वेळा तर डोससाठी नोंदणी करताना नेमकी कुठल्या मोबाइलवरून केली, हेच आठवत नाही. त्यामुळे दुसरा डोस घ्यायला गेल्यानंतर प्रमाणपत्र अपलोड करताना मोबाइल क्रमांक आठवत नसतो. त्यामुळे मग हे प्रमाणपत्र अपलोड करता येत नाही. त्यामुळेही मग दुसरा डोस कसा द्यायचा, ही अडचण यंत्रणेसमोर निर्माण होते.
माेबाइल नंबर काेणाचा हेच आठवत नाही
पहिल्या डोससाठी नोंदणी करताना ज्या मोबाइल क्रमांकावरून नोंदणी केलेली असेल, त्यावरूनच पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अपलोड किंवा डाऊनलोड करता येते. नोंदणी करताना जो मोबाइल क्रमांक दिलेला असेल, तो लक्षात ठेवणे अथवा बरोबर घेऊन जाणे गरजेचे असते. हा मोबाइल नंबर आठवला नाही तर दुसरा डोस घेताना अनेक अडचणी येतात.
- श्यामकांत पेडणेकर, लांजा
लस घेताना आपला नोंदविलेला मोबाइल क्रमांक लक्षात ठेवावा लागतो. घरातील अनेक व्यक्तींच्या नावांची नोंद एकाच मोबाइलवरून केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष लसीकरणासाठी जाताना आपले नाव कुठल्या मोबाइलवरून नोंदविले आहे, हेच लक्षात येत नाही. त्यामुळेही प्रमाणपत्र अपलोड करण्यात समस्या येऊ शकते. त्यामुळे दुसरा डोस घेण्यात अडचण येते.
- स्मिता काजरेकर, रत्नागिरी
लसीकरणावेळी ही काळजी घ्या
- लसीकरणासाठी ऑनलाइन नाेंदणी करावी लागते. यासाठी ज्या मोबाइल क्रमांकावरून नोंदणी केली असेल, त्यावर डोससंदर्भात संदेश येत असतात.
- डोस घेण्यासाठी जाताना हा मोबाइल नेणे गरजेचे असते. मात्र, ज्यांच्याकडे मोबाइल नसेल अशांनी आपल्या अगदी जवळच्या नातेवाइकांचा मोबाइल नंबर द्यावा.
- लस घेतल्यानंतर लगेचच प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे.
पहिल्या डाेसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास...
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र मिळणे ग्रामीण भागात काही वेळा कनेक्टिव्हिटीमुळे अडचणीचे होते. मात्र, प्रमाणपत्र नसले तरी त्या व्यक्तीला दुसरा डोस देण्यासाठी आरोग्य विभागाकडून कुठला अडथळा येत नाही. मात्र, पहिल्या डोससाठी ज्या मोबाइल नंबर दिला असेल तो नंबर दुसरा डोस घेताना जवळ असणे गरजेचे असते. काही वेळा प्रमाणपत्र डाऊनलोड करताना मोबाइल नंबरच अनेकांना आठवत नाही.
कोरोना लसीकरणासाठी नोंदणी ज्या मोबाइलवरून केलेली असते, तो मोबाइल नंबर लक्षात ठेवणे गरजेचे असते. बरेचदा लोक नोंदणी करतात तो नंबर त्यांच्या लक्षात राहात नाही. त्यामुळे दुसऱ्या डोससाठी आल्यानंतर पहिल्या डोसबाबतची माहिती ऑनलाइन मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करताना एकच नंबर द्यावा. आपल्याकडे मोबाइल नसेल तर अगदी घरच्या माणसाचा मोबाइल नंबर द्यावा आणि नंबर लक्षात ठेवावा.
- डाॅ.महेंद्र गावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, रत्नागिरी