कोरोनाला ४२ गावांनी वेशीवर राेखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST2021-04-09T04:33:57+5:302021-04-09T04:33:57+5:30
रत्नागिरी : तालुक्यात कोरोनाने कहर केलेला असला तरी ४२ गावांनी कोरोनाला दूर ठेवले आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे ...

कोरोनाला ४२ गावांनी वेशीवर राेखले
रत्नागिरी : तालुक्यात कोरोनाने कहर केलेला असला तरी ४२ गावांनी कोरोनाला दूर ठेवले आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गावाला काेरोनामुक्त कसे ठेवता येईल, यासाठी ग्रामपंचायतींचे ग्रामस्थांच्या सहकार्याचे सततचे प्रयत्न सुरू आहेत.
रत्नागिरी तालुक्यात कोरोना प्रादुर्भावामुळे तालुकावासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण राजिवडा - शिवखोल मोहल्ला येथे आढळला होता. हा रुग्ण अन्य जिल्ह्यातून आला होता. त्यानंतर साखरतर येथे तीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. मात्र, राजिवडा, साखरतर, मिरकरवाडा, कर्ला येथील ग्रामस्थांनी पुढे येऊन गावातच रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी छोटेखाली रुग्णालये सुरू केली होती.
पहिले तीन महिने रुग्ण मर्यादित संख्येत सापडत होते. मात्र जुलै, ऑगस्टपासून कोरोनाचा कहर वाढू लागला. गणेशोत्सवात कोरोनाने कहरच केला. त्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. तेव्हापासून रुग्णसंख्या कमी आणि पण सातत्यपूर्ण होती. मात्र शिमगोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे येथील चाकरमानी रत्नागिरी तालुक्यात आले होते. याच कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. तसेच शासनाचे कोविड नियम, अटींचे पालनही लोकांकडून केले जात नसल्याने कडक निर्बंध करण्याची वेळ आली. तालुक्यामध्ये आतापर्यंत ३,२६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २९४१ रुग्ण बरे झाले तर २३१ रुग्ण ॲक्टिव्ह असून, ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी तालुक्यात एकूण २०१ गावे असून, ३,१९,४४९ लोकसंख्या आहे. त्यापैकी १५९ गावापर्यंत कोरोनाने मजल मारली आहे, तर अजूनही ४२ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. या गावाच्या ग्रामपंचायतींकडून कोविड नियम, अटींची काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवले जाते. मास्क आणि सॅनिटायरचा वापर केला जात आहे.
कोरोनाला वेशीवर रोखणारी गावे
तरवळ, मायंगडेवाडी, माचिवलेवाडी, आगरनरळ, बोंड्ये, कपिलवस्तू, कळझोंडी, रिळ, काजीरभाटी, जमातवाडी, गुंबद, पन्हळी, सत्काेंडी, कचरे, सांडेलावगण, वैद्यलावगण, सरफरेवाडी, कोंड, वळके, वळके मराठवाडी, चरवेली, नागलेवाडी, कोठारवाडी (चरवेली), पाथरट, कोंडखंडकर, बागपाटोळे, वाडाजून, भोळेगाव, डांगेवाडी, ठिकाणदाते, मधलीवाडी (फणसवळे), नातुंडे, डोर्ले, शिवारआंबेरे, गावखडी मोहल्ला, जांभूळआड, तळीवाडी, धोपटवाडी, नालेवठार, ठिकाण चक्रदेव, ठिकाण सोमण, ठिकाण बेहरे.
संपर्क मोहीम
तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास त्याची पहिली माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रांना कळविली जाते. त्यानंतर त्या केंद्रामधील आरोग्य कर्मचारी बाधित व्यक्तीच्या घराची त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात आरोग्याबाबत उपाययोजना करतात.
ग्रामपंचायतींची जनजागृती
सुरुवातीच्या काळात अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना गावकऱ्यांनी काही गावातून परत पाठवले होते, तर काही गावांमध्ये शाळा, अंगणवाड्यांमध्ये क्वाॅरण्टाइन केले होते. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी ग्रामपंचायती माेठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहेत.