corona virus : लोकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 04:13 PM2020-09-23T16:13:18+5:302020-09-23T16:24:29+5:30

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी दरदिवशी होणाऱ्या स्वॅब आणि रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा दरही वाढतो आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आहे. मात्र, नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढला आहे.

corona virus: Corona infection increases due to people's indifference | corona virus : लोकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढता

corona virus : लोकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढता

Next
ठळक मुद्देलोकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी दरदिवशी होणाऱ्या स्वॅब आणि रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा दरही वाढतो आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आहे. मात्र, नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढला आहे.

४ मे रोजी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काहीअंशी शिथिलता आल्याने मुंबईकर मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात दाखल झाले आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दोन आकडी असलेली संख्या मे अखेर तीन आकडी होत चौपट झाली. त्यानंतर मेअखेरीस २५० असलेली संख्या जूनअखेर ६०० झाली. त्यानंतरही संख्येत लक्षणीय वाढ होत गेली. गेल्या साडेतीन महिन्यात ही संख्या दहापट म्हणजेच ६,८०० पेक्षा अधिक वाढली आहे. मृतांचा आकडाही आता २२५ वर जाऊन पोहोचला आहे.

आॅगस्ट महिन्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे रत्नागिरीतील रुग्णसंख्या वाढणार, हा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. आॅगस्ट महिन्यात प्रादुर्भाव वाढल्याने कोरोनाचा विस्फोट झाला. त्यानंतर ही संख्या अधिकच वाढू लागली आहे. सध्या कोरोनाचा समूह संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा वारंवार कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करण्यासाठी सातत्याने आवाहन करीत आहेत. मात्र, नागरिक बेजबाबदारपणे हे नियम टाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता कोरोना संसर्गाचे प्रमाणही वाढू लागले आहे. दिवसाला पॉझिटिव्ह येणाऱ्या अहवालाची संख्या वाढली आहे.

कोरोना योद्धेही मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे आधीच अपुऱ्या असलेल्या आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेऊन नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन शारीरिक अंतर ठेवणे, त्याचबरोबर मास्क वापरणे, सॅनिटाइझ करणे किंवा साबणाने होत धुण्याची सवय नियमित करायला हवी.

जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग वाढू लागला असला तरी नागरिक शारीरिक अंतराची तमा न बाळगता विनामास्क बाहेर भटकत आहेत. त्यामुळे समूह संसर्गाचे प्रमाण रोखणे आता आरोग्य यंत्रणेसमोर खरोखरच मोठे आव्हान ठरत आहे.

खरेदीला गर्दी

आता सर्वत्र अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. सर्वच बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या स्वैर वागण्यात अधिकच भर पडली आहे. दुकाने सुरू झाल्याने लोक खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. यातूनच व्यापारी आणि नागरिक बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही नागरिक कोरोना कायमचा गायब झाला, अशी बेफिकीरी दाखवत आहेत. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करीत आहेत.

मृत्यूदर वाढतोय

जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २२ सप्टेंबरअखेर ५०८० (७४.३५ टक्के) आहे. रुग्ण संख्येत एकूण लोकसंख्येच्या ०.३ टक्के वाढ झाली आहे, तर मृत्यू दर २.९ टक्क्यांवरून पुन्हा ३.२९ टक्के एवढा वाढला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी आता ६७ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचली असली तरी मृत्यूची वाढती टक्केवारीही चिंताजनक आहे.


लोकांमध्ये कोरोनाबाबतची जागरूकता नाही. त्यामुळे अजूनही शारीरिक अंतर राखणे, मास्क लावणे, यांचे पालन केले जात नाही. त्यामुळेच समूह संसर्ग वाढू लागला आहे. त्याचबरोबर गंभीर आजार किंवा गंभीर शस्त्रक्रिया झालेले रुग्ण यांनीही भीती न बाळगता खबरदारी घ्यायला हवी. पण आपल्याकडे अंगावर आजार काढणे, ही मानसिकता असल्याने चाचणी वेळेवर होत नाही. लोक दुसरा कुठला आजार वाढला, तरच तपासणी करण्यासाठी येतात. मात्र, कोरोना केवळ हृदय आणि फुफ्फुसावर परिणाम करत नाही तर इतर गंभीर आजारावरही करतो, हे न लक्षात घेतल्याने आजार वाढतो आणि मृत्यूदरही वाढ जातो.
- डॉ. अलिमियॉ परकार,
रत्नागिरी

Web Title: corona virus: Corona infection increases due to people's indifference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.