जिल्ह्याला एक दिवस पुरेल एवढीच कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST2021-04-20T04:32:48+5:302021-04-20T04:32:48+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यासाठी आलेल्या ५,९३० लसींचा पुरवठा करण्यात आल्याने सोमवारी पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, ही लस एक दिवस ...

जिल्ह्याला एक दिवस पुरेल एवढीच कोरोना लस
रत्नागिरी : जिल्ह्यासाठी आलेल्या ५,९३० लसींचा पुरवठा करण्यात आल्याने सोमवारी पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, ही लस एक दिवस पुरेल एवढीच होती. त्यामुळे पुन्हा लस आल्यानंतर बुधवारी लसीकरण करण्यात येणार आहे.
राज्यात लसीकरण सुरू असून लस शासनाकडून येण्याचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्याला पुरेशी लस मिळत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाकडून शासनाकडे ३ लाख लसींची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. आतापर्यंत १,१५,९०३ लोकांनी लसीकरणाचा फायदा घेतला आहे.
रुग्ण वाढत असल्याने जिल्हावासीयांकडून लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शनिवारी लस आल्यानंतर रविवारी सर्व लसीकरण केंद्रांवर लसीचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, हा साठा एक दिवस पुरेल इतकाच होता. त्यामुळे मंगळवारी लस आल्यानंतरच बुधवारी लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.