विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची सक्तीने होतेय कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST2021-05-23T04:30:59+5:302021-05-23T04:30:59+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ३२ हजारपेक्षा अधिक झाली आहे तर मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले असून, मृतांनी ...

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची सक्तीने होतेय कोरोना चाचणी
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ३२ हजारपेक्षा अधिक झाली आहे तर मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले असून, मृतांनी हजारी ओलांडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. मात्र, अजूनही लोकांमध्ये कोरोनाबाबत गांभीर्य असल्याचे दिसत नाही. लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्यांची पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा तसेच नगर परिषदेच्या सहकार्याने ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. यात २४० व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला आहे. एकाच घरातील सर्व सदस्य बाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे संसर्ग थोपविणे आरोग्य यंत्रणेच्या आवाक्याबाहेर जावू लागले आहे. लोकांनी स्वयंशिस्त पाळून सोशल डिस्टन्सिंग पाळले तरच कोरोना आटोक्यात येणार आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने शासनाच्या आदेशानुसार १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू केले आहे.
मात्र, सध्या लॉकडाऊन असूनही अनेक व्यक्ती रूग्णालयात जायचेय, भाजी आणायला जायचेय, औषधे आणायला जायचेय, असे सांगून बाहेर पडत आहेत. मात्र, अशांना प्रशासनाकडून चांगलाच दणका देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींची ॲन्टिजन चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर चांगलाच वचक बसत आहे.
कारणे तीच, कोणाचा दवाखाना तर कोणाचा भाजीपाला
घराबाहेर पडण्यासाठी कारणं सांगावी लागत असल्याने काहीजण नातेवाईकांना बघायला जातोय, त्यांची औषधे आणून द्यायचीय, अशी कारणे सांगता
काहींच्या घरी दुधाचा तुटवडा असतो, भाजीपाला संपला आहे, अशी कारणे असतात.
काहीजण घरात बसून कंटाळा आल्याने मग दवाखान्यात जायचेय सांगून सटकण्याचा प्रयत्न करतात.
शहरात मुख्य ठिकाणी तपासणी
मारूती मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, कोकणनगर, धनजी नाका, मिरकरवाडा, आठवडा बाजार तसेच कुवारबाव आदी प्रमुख ठिकाणी तपासणी केली जात आहे.
सध्या आरोग्य विभागाकडून मोबाईल पथकाद्वारे शहरातील विविध भागांमध्ये ॲन्टिजन चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाहेर फिरणाऱ्यांवर काहीअंशी वचक बसला आहे.