चोरवणे येथे कोरोना विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST2021-06-29T04:21:59+5:302021-06-29T04:21:59+5:30
देवरूख : चोरवणे येथे कोरोना रुग्णांच्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन पंचायत समिती, संगमेश्वरचे सभापती जयसिंग माने, जिल्हा परिषद सदस्य रजनी ...

चोरवणे येथे कोरोना विलगीकरण कक्ष
देवरूख : चोरवणे येथे कोरोना रुग्णांच्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन पंचायत समिती, संगमेश्वरचे सभापती जयसिंग माने, जिल्हा परिषद सदस्य रजनी चिंगळे यांच्या उपस्थितीत झाले. चोरवणे गावात आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने गाव कोरोनामुक्त आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
यानंतर ग्राम कृती दलासोबत सभापती माने यांनी सहविचार सभा घेतली. गावात मोठ्या प्रमाणात लसीकरण प्रक्रिया राबविणे, तपासणी करणे यासारख्या उपाययोजनांमुळे गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या नाही, याबद्दल माने यांनी सर्वांचे कौतुक केले.
गावात यापुढे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कुटुंब सर्वेक्षण पथक, कोरोना विलगीकरण कक्ष पथक, वाहनचालकांचे पथक, लसीकरण पथक व कोविड हेल्पलाईन पथक अशा पथकांच्या माध्यमातून पुढील काळात आपत्कालिन नियोजन म्हणून गावात विविध पथके सज्ज झाली आहेत. गावात पुन्हा एकदा नागरिकांची काळजी म्हणून मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणीही करण्यात येणार आहे.
रवींद्र शिंदे यांनी आपल्या माध्यमातून दोन बेडची व्यवस्था केली. अनेक ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे व दानशूरपणामुळे कोरोनाविरोधात लढणे शक्य झाले, असे मत सरपंच दिनेश कांबळे यांनी आढावा बैठकीत मांडले. यावेळी विस्तार अधिकारी घुले, उपसरपंच अनंत बसवणकर, ग्रामपंचायत सदस्य कांबळे, भोगले, भायजे, ग्रामसेविका गौरी नेवरेकर, माजी सरपंच सुदेश चव्हाण, माजी सरपंच विजय कांबळे, मुख्याध्यापिका दरडी, आरोग्यसेविका शिंदे, मनिषा कांबळे, अंगणवाडी सेविका रश्मी शिंदे, पूजा कांबळे, शिक्षक उपस्थित होते.
--------------------------------
देवरूख - चोरवणे येथे सभापतींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरपंच दिनेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले.