कोरोना याेद्धे पुन्हा तत्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:51+5:302021-09-11T04:32:51+5:30
रत्नागिरी : गेल्या सुमारे पावणेदोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाचे संकट सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन ...

कोरोना याेद्धे पुन्हा तत्पर
रत्नागिरी : गेल्या सुमारे पावणेदोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाचे संकट सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, यासाठी आरोग्य, पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाची सर्वच यंत्रणा प्रयत्न करीत असून अहोरात्र त्यांचे कार्य सुरू आहे. या गणेशात्सवातही सर्व नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आता पुन्हा हे कोरोना योद्धे सज्ज झाले आहेत.
सध्या जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. दर दिवशी लाखोंनी चाकरमानी मुंबईतून कोकणात दाखल होत आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होवू लागल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई सध्या कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवात म्हणजेच गेल्या वर्षी आॅगस्ट - सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढले होते. त्यामुळे या गणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न येवू नये म्हणून पुन्हा कोरोना योद्धे सज्ज झाल आहेत.
जिल्ह्यात सर्व नागरिक गणेशोत्सव साजरा करताना हे कोरोना योद्धे मात्र, आपला सण बाजुला ठेवून आपल्या कर्तव्यावर तैनात आहेत. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची विविध तपासणी नाक्यांवर माहिती घेतली जात आहे. यासाठी पोलीस, आरोग्य तसेच शिक्षक आदी कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. तसेच गावात आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या ग्राम कृतीदलाचे सदस्य गावात येणाऱ्यांचे दरदिवशी सर्वेक्षण करीत आहेत. त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत का, आरटीपीसीआर चाचणी झाली आहे का, कुठला त्रास आहे का, आदी माहिती संकलित केली जात आहे. ज्यांचे लसीकरणही झालेले नाही किंवा आरटीपीसीआर चाचणी झालेली नाही, अशांची गावी आल्यानंतर या कृती दलाच्या माध्यमातूच चाचणी केली जात आहे. पाॅझिटिव्ह आल्यास त्यांना विलगीकरणात दाखल करण्याची जबाबदारीही या कृती दलांकडे सोपविण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी पोलीसमित्र म्हणून जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत पोलीस आणि शिक्षक मित्र पुन्हा प्रत्येक शहरांमध्ये वाहन प्रवेश हद्दींवर वाहनांची तपासणी करीत आहेत. एस.टी. आगार, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. तिथेही विविध विभागांचे कर्मचारी कार्यरत आहेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या आरोग्य, पोलीस, महसूल, शिक्षण आदी विभाग सध्या आपले सण विसरून नागरिकांसाठी दिवसरात्र परिश्रम करीत आहेत. नागरिकांचा गणेशोत्सव आनंदात साजरा व्हावा, सर्व कोरोनापासून सुरक्षित रहावेत, यासाठी तत्परतेने आपले कार्य करीत आहेत.