कोरोनाने तिघांचा मृत्यू, ६७ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:07+5:302021-09-18T04:35:07+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात ६७ नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. ५० रुग्ण ...

कोरोनाने तिघांचा मृत्यू, ६७ नवे रुग्ण
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात ६७ नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. ५० रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. सद्यस्थितीत १,२१६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. बाधित रुग्णांपैकी ३९ रुग्ण रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २,३८२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांत कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा दर कमी झालेला असून, तो ३.८ टक्के आहे. जिल्ह्यात दिवसभरात चिपळूण तालुक्यातील २ आणि रत्नागिरी तालुक्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. मागील आठवड्यात बाधितांच्या मृत्यूचा दर २.१३ टक्के होता. जिल्ह्यात आतापर्यंत ७३,६४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा बरे होण्याचा दर ९५.३४ टक्के आहे.
जिल्ह्यात ३,४१५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर चाचणीत २७ रुग्ण, तर अँटिजन चाचणीत ४० रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये राजापूर आणि मंडणगड तालुक्यातील प्रत्येकी ३ रुग्ण असून, दापोलीतील ८, खेडमधील ५, गुहागरातील ६, चिपळुणातील २१, संगमेश्वरमधील १२, रत्नागिरीतील ८ आणि लांजातील एका रुग्णाचा समावेश आहे. बाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,२४६ झाली आहे.