कोरोना तपासणी तंत्रज्ञांना परत कामावर घेणार : सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST2021-09-17T04:38:45+5:302021-09-17T04:38:45+5:30
रत्नागिरी : कोरोना रुग्ण कमी झाल्यामुळे कोरोना तपासणी केंद्रांवरील अनेक तंत्रज्ञ कमी करण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता ...

कोरोना तपासणी तंत्रज्ञांना परत कामावर घेणार : सामंत
रत्नागिरी : कोरोना रुग्ण कमी झाल्यामुळे कोरोना तपासणी केंद्रांवरील अनेक तंत्रज्ञ कमी करण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यासह एकूण १० जिल्ह्यांमधील तंत्रज्ञांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
अनेक ठिकाणी कोविड सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ती पुन्हा सुरू होतील का, असा प्रश्न करण्यात आला असता मंत्री सामंत यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत रुग्णसंख्या घटली आहे. रत्नागिरीत १०० पेक्षा कमी रुग्ण सापडत आहेत. अजून परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, जर १५० पेक्षा जास्त रुग्ण रोज सापडू लागले तर बंद केलेली कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करावी लागतील, अशी सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
रुग्ण आणि चाचण्या कमी झाल्यामुळे कोरोना तपासणी केंद्रांवरील अनेक तंत्रज्ञ कमी करण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि अन्य काही अशा दहा जिल्ह्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.