कोरोना व जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:50+5:302021-05-11T04:33:50+5:30
गतवर्षीपासून कोरोना संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रशासकीय, आराेग्य, पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे. कोरोना बरा होतो, ...

कोरोना व जबाबदारी
गतवर्षीपासून कोरोना संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रशासकीय, आराेग्य, पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे. कोरोना बरा होतो, यापेक्षा लोकांमध्ये असलेला गैरसमज व भीती दूर करण्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा करण्यासाठी ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी ९९ टक्के लोकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. एक टक्का लोक माहिती दडविण्याचा प्रयत्न करतात, काहीवेळी सर्वेक्षण मोहिमेवरील कोविड योध्द्यांनाच दमदाटी करण्याचे प्रकार उघडकीस आणत आहेत. वास्तविक प्रशासनावर वाढत्या काेरोना रुग्णांमुळे ताण वाढला आहे. काही गावात तर योग्य नियोजनामुळे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, काही गावातून मात्र ते अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यात काेरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. प्रशासनाकडून कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी कोरोना केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. असे असताना सर्वेक्षण माेहिमेतील कोविड योध्द्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांना दमदाटी करणे अयोग्य आहे. वास्तविक त्यांना सहकार्य करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. तापसरी व अन्य आजार असणाऱ्यांवर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. ताप, अंगदुखी, घसादुखी यामुळे त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी तसेच कुटुंबियांनी आजार जास्त दिवस अंगावर काढणे अयोग्य आहे. वेळेवर वैद्यकीय चाचण्या केल्या, तर नक्कीच उपचारामुळे लोक बरे होतात. मात्र घाबरून घरीच औषधे घेणाऱ्या काही
लोकांच्या जिवावर बेतले आहे. निव्वळ कोरोना झाला आहे, याचा धक्का सहन न झाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी नाही. त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता वेळीच उपचार करणे व आजाराबाबत न लपवता आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे गरजेचे आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, ग्रामीण भागात तर उच्चांक झाला आहे. कोरोनाची भीती वाढल्याने लसीकरणाबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. शासनाकडून १८ पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र लस उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत असल्यानेच लसीकरणामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. लसीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन गरजेचे आहे. ग्रामीण भागात इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला असल्यामुळे ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये व्यत्यय येत आहे. लसीकरणातील गोंधळ टाळण्यासाठी ‘माझी रत्नागिरी- माझी जबाबदारी’ सर्वेक्षण मोहिमेप्रमाणे गावातील उपक्रेंद्रातून लस उपलब्ध करून दिली व दररोजचे डोस याबाबतचे नियोजन केले, तर नक्कीच लसीकरण मोहीम व्यवस्थित व सुरळीत होईल. त्यासाठी शहर असो वा गाव, त्या त्या प्रभागातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेता येईल.
लसीकरण केंद्रावरील गर्दी व तेथे होणारी ‘तू तू मै मै’ टाळण्यासाठी प्रभावी योजनेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी शासनाची असल्याने शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शासनाने कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ उपक्रम राबविण्यात येत असताना, कडक निर्बंध जारी केले आहे. अत्यावश्यक सेवेसाठी वेळ निश्चित केली आहे. असे असतानाही रस्त्यावर कामाशिवाय फिरणारे महाभाग आहेत. त्यासाठी कोरोना तपासणी हा उपाय चांगला प्रभावी ठरला. कडक उन्हातून नाक्या-नाक्यावर पोलीस, पाेलीसमित्र तपासणी करीत आहेत. किमान सहानुभूती म्हणून तरी कारणाशिवाय बाहेर न पडता घरात राहून स्वत:ची व कुटुंबियांची सुरक्षा जपणे योग्य राहील.