कोरोनामुळे निर्यातीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST2021-05-23T04:30:37+5:302021-05-23T04:30:37+5:30
आंबा हंगामच यावर्षी नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाला. आंबा बाजारात आला. मात्र, त्याचवेळी लॉकडाऊन सुरू झाल्याने आंबा विक्रीचा प्रश्न ...

कोरोनामुळे निर्यातीवर परिणाम
आंबा हंगामच यावर्षी नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाला. आंबा बाजारात आला. मात्र, त्याचवेळी लॉकडाऊन सुरू झाल्याने आंबा विक्रीचा प्रश्न निर्माण झाला. पणन विभागातून सद्गुरू एंटरप्राइजेसच्या माध्यमातून रत्नागिरीतून ‘थेट निर्यात’ सुरू होती. १,६१४ डझन इतकाच आंबा यावर्षी निर्यात झाला. कोरोनामुळे विमान वाहतूक बंद करण्यात आल्याने मागणी असतानाही निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध न झाल्याने निर्यात थांबली. गतवर्षी कोरोनामुळे हवाईमार्गे वाहतूक बंद झाल्यानंतर जल वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, यावर्षी जल वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे निर्यात थांबली.
कोरोनामुळे लॉकडाऊन असताना उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीत मागणी असतानाही निर्यात झाली नाही. यावर्षी आंबा उत्पादन कमी असताना, परदेशातून आंब्याला चांगली मागणी होती. पणन मंडळाच्या इमारतीमध्ये आंब्यावर प्रक्रिया करून आंबा पॅकिंग करून वातानुकूलित वाहनातून मुंबईतील विमानतळावर पाठविण्यात येत होता. कोरोनामुळे विमानवाहतूक सेवा बंद करण्यात आल्यामुळे निर्यात ठप्प झाली. आंबा उत्पादन कमी असतानाच, निर्यातीवर परिणाम झाला. परदेशातून आंब्याला चांगली मागणी असल्याने पणन मंडळातर्फे सद्गुरू एंटरप्राइजेसच्या माध्यमातून कॅनडासाठी ४५० डझन, लंडनसाठी ७८८ डझन, तर कतारसाठी ४२६ डझन आंबा निर्यात करण्यात आला.
पणन विभागाच्या माध्यमातून सद्गुरू एंटरप्राइजेसतर्फे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात येऊन रत्नागिरीतून थेट आंबा निर्यात करण्यात येत होता. विमानसेवाच बंद झाल्यामुळे निर्यात ठप्प झाली. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी दिल्लीतील विक्रीवर विशेष भर देण्यात आला. दिल्लीत एकूण सात हजार २०० डझन आंबा पाठविण्यात आला. दिल्लीनंतर विक्रीसाठी पर्याय शोधताना, राज्यांतर्गत विक्रीवर भर देण्यात आला. वाशी येथील आंब्याचे दर गडगडले असून, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पुणे, मुंबई, नाशिक येथे शेतकऱ्यांच्या ५०० आंबा पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात आल्या.
मुंबई, पुणे, नाशिक येथील ग्राहकांशी संपर्क साधून शेतकऱ्यांचा आंबा विक्रीसाठी पाठवून ५०० ते ६०० रुपये डझन दराने आंबा विक्री करण्यात आला. वाशी येथील एपीएमसी मार्केटपेक्षा राज्यांतर्गत विक्री परवडत होती. शेतकऱ्यांना हमाली, वाहतूक खर्च जाऊन दर परवडत नसल्यामुळे एपीएमसीपेक्षा जागेवरील विक्री शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली.
यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी होते. त्यातच तौउते चक्रीवादळामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कोरोनामुळे निर्यात तर रोडावलीच. शिवाय शेवटच्या टप्प्यातील आंबा पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
कोट
स्थानिक शेतकऱ्यांना जागेवरच चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी अपेडाच्या मान्यतेने सद्गुरू एंटरप्राइजेसतर्फे जगातील विविध देशांपर्यंत आंबा विक्री करताना ‘थेट निर्याती’वर भर देण्यात आला होता. विमानसेवाच बंद झाल्यामुळे निर्यात ठप्प झाल्यानंतर दिल्लीसाठी बऱ्यापैकी आंबा पाठविण्यात आला. त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यांतर्गत आंबा विक्रीसाठी प्रयत्न करण्यात आले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ग्राहकांशी संपर्क साधून विक्री करण्यात आली. मात्र, यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी राहिल्याने निर्यात रोडावली.
-प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सद्गुरू एंटरप्राइजेस