बागायतदारांच्या समस्या सोडविण्यास सहकार्य
By Admin | Updated: July 23, 2014 21:53 IST2014-07-23T21:52:38+5:302014-07-23T21:53:31+5:30
जितेंद्र आव्हाड : रत्नागिरीत फलोत्पादन विभागाची आढावा बैठक

बागायतदारांच्या समस्या सोडविण्यास सहकार्य
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फलोत्पादनासाठी महत्त्वाचा जिल्हा असून, येथील फळबागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन फलोत्पादन आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी बी. जी. बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, शेखर निकम यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोकणातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम सोप्या पद्धतीने मिळावी, यासाठी लाभार्थींनी दिलेल्या हमीपत्रावर रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा कोकणातील शेतकऱ्यांना होत असून, नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुलभ झालेली आहे.
तसेच फळबागायतदारांच्या इतर समस्या सोडवण्यासाठीदेखील शासन कटिबद्ध आहे. यानुसार तापमानातील होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील चढ उतार लक्षात घेऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत कृषी विभागाने प्रस्ताव सादर करावा. कोकणातील वणव्यामुळे फळबागांच्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्याबाबतदेखील प्रस्ताव सादर केल्यास पुढील बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे आव्हाड यांनी सांगितले.
पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वणव्यामुळे होणारे नुकसान आणि फळपीक विमा यासंदभातील प्रश्न सोडवण्यासाठी फलोत्पादन मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच पीक विम्याची भरपाई जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने गणेशोत्सवाच्या काळात विशेष जनजागृती करावी, अशी सूचना केली.
शहा यांनी जिल्ह्याच्या फलोत्पादनाच्या माहितीचे सादरीकरण केले. फलोत्पादन मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय हॉर्टिकल्चर बोर्डकडून तारांकित दर्जा प्राप्त करणाऱ्या कृषी विभागाच्या रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी नर्सरी, हातखंबा नर्सरी, जुवाठी (ता. राजापूर) येथील नर्सरींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध अधिकाऱ्यांसोबत तालुका कृषी अधिकारी आणि नर्सरीचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)