गणेशभक्तांसाठी यंदा १४५० गाड्यांची सोय
By Admin | Updated: August 10, 2015 00:37 IST2015-08-10T00:37:24+5:302015-08-10T00:37:24+5:30
रत्नागिरी आगार : एस. टी. प्रशासन वाहतुकीसाठी सज्ज

गणेशभक्तांसाठी यंदा १४५० गाड्यांची सोय
रत्नागिरी : भक्तांना वेध लागलेल्या गणपती बाप्पांच्या आगमनाला अवघा महिना शिल्लक राहिला आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने गणेशोत्सव कालावधीत मुंबई मार्गावर १४५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी दरवर्षी जादा गाड्या सोडून प्रवाशांची सोय करण्यात येते. १२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत एस. टी.च्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एखाद्या गावातील मंडळींनी ४४ सीटचे एकत्रित आरक्षण केल्यास त्यांना त्यांच्या गावासाठी खास बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रुप बुकिंगला १२ आॅगस्टपासून प्रारंभ होणार आहे. कोकण रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असली तरी एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. ऐन गणेशोत्सवात रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेले असताना एस. टी.ने मात्र सुरळीत, सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे, भांडुप, कुर्ला नेहरूनगर, विठ्ठलवाडी, नालासोपारा, परळ, कल्याण आदी मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवात रत्नागिरी विभागाने सन २०१३मध्ये १३१७ गाड्या सोडल्या होत्या. त्याद्वारे १ कोटी ८७ लाख ३८ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. सन २०१४मध्ये १४३० जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे विभागाला दोन कोटी १० लाख ६९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर यावर्षी १४५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकरांच्या परतीसाठी २१ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय नियमित १५० गाड्या दररोज मुंबई मार्गावर धावत आहेत.
गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता जादा गाड्यांसमवेत चेकपोस्ट गस्तीपथके तैनात करण्यात येणार आहेत. सकाळी १० ते १२.३० तसेच १२.३० ते ६ यावेळेत गस्तीपथके महामार्गावर कार्यरत राहून जादा गाड्यांची तपासणी करणार आहेत. कशेडी येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे. याशिवाय तात्पुरते वाहनतळ व दुरुस्ती पथकांची सुविधा महामार्गावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक आगारामध्ये चौकशी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी दिली. (प्रतिनिधी)