शिवसेना नेत्यांच्या भूमिकेत विरोधाभास ?
By Admin | Updated: May 26, 2015 00:53 IST2015-05-25T23:18:50+5:302015-05-26T00:53:24+5:30
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प : उलट-सुलट वक्तव्यामुळे प्रकल्पग्रस्तही पडले बुचकाळ्यात...

शिवसेना नेत्यांच्या भूमिकेत विरोधाभास ?
रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेने सातत्याने व ठाम राहात विरोधाची भूमिका घेतली आहे. मात्र, शिवसेनेअंतर्गत काही नेत्यांची याबाबतची भूमिका तळ्यातमळ्यात असल्यासारखी जाहीर होत असून, मूळ भूमिकेशी विरोधाभास निर्माण करणारी ठरत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. जैतापूर प्रकल्प आता महत्त्वाच्या टप्प्यावर असताना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवसेनेला प्रकल्प होणारच, असे स्पष्टपणे सांगितलेले असताना शिवसेनेतच होणाऱ्या उलटसुलट वक्तव्यांनी प्रकल्पग्रस्तही आता बुचकाळ्यात पडल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या प्रकल्पाला जैतापूरवासीयांचा तीव्र विरोध असल्याने शिवसेनेचाही या प्रकल्पाला कडवा विरोध राहील. हा प्रकल्प कोणत्याही स्थितीत होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यातच राज्य विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती तुटली अन भाजपाने जैतापूर प्रकल्पाचा उघड पुरस्कार केला. शिवसेनेनेही विरोध सोडून प्रकल्पाला पाठिंबा द्यावा, असे सुचविले. त्यातून सातत्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये राजकीय ठिणग्या उडत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे मंत्री व जिल्ह्याचे सुपुत्र रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही, प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे अन्य नेते या प्रकल्पाला आपला प्रखर विरोध असल्याचे जाहीर करीत असताना कदम यांच्या या विधानाने जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेतच विरोधाभास असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
कदम यांच्या वक्तव्यानंतर दोनच दिवसांत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे कडवे विरोधक म्हणून नेहमी पुढे असणारे आमदार राजन साळवी व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पस्थळी हल्लाबोल केला. प्रकल्पस्थळी काम कोठे सुरू आहे, याची माहिती घेऊन आत सुरू असलेले काम बंद पाडले. आतील यंत्रे कंपनीच्या गेटबाहेर काढायला लावली. कंपनीजवळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या एकूणच स्थितीवरून प्रकल्पाबाबत कडवी भूमिका व तळ्यात मळ्यात भूमिका समोर आल्याने हा विरोधाभास संपणार की काही चमत्कार घडणार, याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत. (प्रतिनिधी)