अधिकार्यांनी देयके थकविल्याने ठेकदाराची आत्महत्या
By Admin | Updated: June 1, 2014 00:45 IST2014-06-01T00:43:52+5:302014-06-01T00:45:10+5:30
मंडणगडमधील घटना, वातावरण तंग

अधिकार्यांनी देयके थकविल्याने ठेकदाराची आत्महत्या
मंडणगड : मंडणगड पंचायत समितीच्या अधिकार्यांनी देयके थकविल्याने बाजारातील देण्यांना कंटाळून पालघर येथील ठेकेदार नियाज पठाण (४५) यांनी आज शनिवारी सकाळी गावाशेजारील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ९ वाजता ग्रामस्थांना नियाज पठाण यांचा मृतदेह आढळला. आत्महत्येपूर्वी पठाण यांनी लिहून ठेवलेल्या पत्राने पूर्ण तालुका हादरला आहे. त्यांनी अधिकार्यांची नावेच पत्रात नमूद केली असल्याने अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकारानंतर तालुक्यातील अनेकांनी पालघर येथे धाव घेतली. पोलिसांना पठाण यांच्या पार्थिवाशेजारी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. पठाण यांची पालघर, विन्हे, देवांचा डोंगर व दापोली तालुक्यात शासकीय कामे सुरू होती. यातील बरीच कामे पन्नास ते शंभरटक्के पूर्ण होती. या कामापोटी त्यांना शासनाकडून सुमारे ७० लाख रूपये येणे बाकी होते़ येथील पंचायत समितीमधील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आनंदे, बांधकाम विभागाचे घस्ते यांच्याकडे ते वारंवार संपर्क साधून होते. या संदर्भात अधिकारी आनंदे याना २ लाख रूपये दिल्याचे व तरीही अधिकारी आपल्याला केवळ आश्वासने देत होते, असे त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे. काही कामांची देयके तर तीन वर्षांपूर्वीची आहेत. या सार्यातून निराशा आल्याने दोनच दिवसापूर्वी त्यांनी आपली सद्यस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी रत्नागिरी येथे जाऊन माहिती घेतली होती. मात्र तेथेही त्यांना त्यांच्या फाईल सापडल्या नव्हत्या. केवळ आश्वासने मिळत होती तर बाजारातील देणेकर्यांची संख्या वाढत होती. या सार्या नैराश्येतून त्यांनी गळफास लावून घेतला. पोलिसांचा पंचनामा पूर्ण झाल्यानंतर पठाण यांचे यांचे पार्थिव मंडणगड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. पठाण यांनी संबंधित अधिकार्यांची नावेच आपल्या पत्रात नमूद केली असल्याने त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्या अधिकार्यांना ताबडतोब अटक करावी व त्यांचे निलंबन करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन व दफनविधी न करण्याची भूमिका घेण्यात आली. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी दिघे, तहसीलदार कविता जाधव, पोलीस निरीक्षक हिंदुराव काटकर यांनी लोकांशी चर्चा केली व संबंधितांना अटक करण्याचे आश्वासन दिले. पोलीस कारवाईचा अहवाल आल्यानंतर निलंबनाबाबतची कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्याने हे प्रकरण निवळले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. मृत नियाजचे बंधू भाऊ फारख पठाण यांनी या प्रकरणी मंडणगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नियाज पठाण यांच्या पश्चात तीन, सात व आठ वर्षाच्या तीन मुली व आई असा परिवार आहे.