रत्नागिरी : खेड्यापाड्यात राहणाऱ्या प्रत्येकाला पिण्यायाेग्य पाणी मिळावे, यासाठी शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत पाणी याेजना राबविण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेंतर्गत कामेही सुरू झाली. मात्र, या याेजनेंतर्गत ठेकेदारांची तब्बल ८० कोटी रुपयांची थकीत बिले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या ठेकेदारांनी जलजीवनची कामे बंद केली आहेत. जिल्ह्यातील जलजीवनच्या सुमारे ७५० योजनांचे काम बंद करण्यात आले आहे.जिल्ह्यात जलजीवनच्या १,४३२ योजना मंजूर आहेत. त्यापैकी १,४२८ योजनांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात १,४१३ योजनांची कामे सुरू करण्यात आली होती. तर जिल्ह्यातील ५६४ योजनांची कामे १०० टक्के पूर्ण झाली होती. तसेच ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान काम सुरू असलेल्या ३०५ योजना असून, ५० ते ७५ टक्के काम झालेल्या ३०७ योजना आहेत. तर २५ ते ५० टक्के काम १७५ योजनांचे झालेले असून, शून्य ते २५ टक्के काम झालेल्या ५४ योजना आहेत. ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू असली, तरी त्या ठेकेदारांना अद्याप त्यांची बिले दिलेली नाहीत.जलजीवनच्या ठेकेदारांना बिले न मिळाल्याने ते अनेकदा जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, शासनाकडूनच निधी न आल्याने जिल्हा परिषद त्यांची बिले कुठून देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत आले आहेत. या याेजनांच्या कामांसाठी काही ठेकेदारांनी कर्ज उचलले असून, बिल न मिळाल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत.
निधीअभावी कामे ठप्पजलजीवन मिशनच्या कामाचे पैसे अनेक महिन्यांपासून दिले गेलेले नाहीत. त्यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे ठेकेदारांनी योजनांची कामे थांबवली आहेत. जलजीवन योजनेसाठी निधी आल्याशिवाय ही कामे पूर्णत्वाला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा निधी येणार कधी? ही कामे हाेणार कधी? असा प्रश्न केला जात आहे.
ठेकेदार आर्थिक अडचणीतठेकेदारांनी बँकांकडून घेतलेले कर्ज आणि त्यावर वाढणारे व्याज यामुळे ते आर्थिक अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे राज्यात थकलेल्या बिलांमुळे ठेकेदारांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच परिस्थिती येण्याची भीती जिल्ह्यातील जलजीवनच्या ठेकेदारांकडून व्यक्त केली जात आहे.