चिपळुणातील इमारतीचे बांधकाम खचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:18+5:302021-07-10T04:22:18+5:30
चिपळूण : शहरातील चिंचनाका परिसरातील माउली सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक कोसळला. या ...

चिपळुणातील इमारतीचे बांधकाम खचले
चिपळूण : शहरातील चिंचनाका परिसरातील माउली सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक कोसळला. या घटनेमुळे संबंधित इमारती मूळ बांधकामाला धोका निर्माण झाला आहे.
चिंचनाका येथील पाटणकर नर्सिंग होमच्या बाजूला ही इमारत आहे. साधारण १९९७मध्ये उभारलेली ही इमारत असून, या इमारतीला लागून शिवनदीकडे वाहत जाणारा मोठा नाला आहे. या नाल्याच्या बाजूने दगडी बांधकामाची संरक्षक भिंत आहे. मात्र या भिंतीचा काही भाग कोसळल्याने त्यावर केलेले काँक्रीटचे बांधकामही कोसळले. त्यामुळे या इमारतीतील दोन गाळ्यांसह माउली सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीलाही धोका निर्माण झाला आहे.
या घटनेनंतर चिंचनाका येथे मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे भोगाळे परिसरात वाहतूक कोंडीही झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व त्यापाठोपाठ नगरपरिषद यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. आमदार शेखर निकम यांनीही घटनास्थळी भेट देऊन नगरपरिषद प्रशासनाला व त्या इमारतीतील व्यावसायिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या. यावेळी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी नगर परिषद बांधकाम विभागाला सूचना देऊन खचलेला भाग सील केला आहे.
090721\img-20210709-wa0027.jpg
चिपळुणातील इमारतीचे बांधकाम खचले