निर्णायक क्षणी विजय मिळवून दिला...

By Admin | Updated: May 27, 2014 01:02 IST2014-05-27T00:55:43+5:302014-05-27T01:02:47+5:30

अशोक शिंदे : कोकणने भरभरुन दिले त्याचे देशाने कौतुक केले

Conquered the crucial moment ... | निर्णायक क्षणी विजय मिळवून दिला...

निर्णायक क्षणी विजय मिळवून दिला...

संजय सुर्वे -शिरगाव आम्ही ज्या मातीत वावरत आहोत, त्याच मातीत कबड्डीची सुरुवात झाली. बालपणात या खेळाशिवाय दुसरं खेळायला काहीच नव्हतं. चिपळूण तालुक्यातून सह्याद्रीच्या सोबतीला असलेल्या ओवळी (ता. चिपळूण) येथून कबड्डीने झेप घेतली. कबड्डीने त्यांना घडविले. निर्णायक क्षणी देशासाठी विजय मिळविला आणि चिपळूणचे नाव जगात उंचावले. भारतातील क्रीडा विश्वातला व कबड्डीतील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार त्यांना मिळाला. अशोक शिंदे हे त्यांचे नाव. चिपळूणच्या क्रीडाविश्वाशी मार्गदर्शक या नात्याने त्यांचे कार्य सुरु झाले आणि आज राज्यभरात कबड्डीची यशोगाथा त्यांच्या प्रयत्नातून सुरु झाली आहे. प्रत्येकाला अडचणी येतात, प्रत्येकाजवळ तितकाच वेळ आहे. मात्र हे खेळाडू घडतात कसे, असा प्रश्न पडावा, असे शिंदे यांचे कर्तृत्व आहे. शिंदे घराणे पूर्वापार सैन्यदलात व वडील पोलिस दलात. ३० जानेवारी १९६६ चा जन्म. तेव्हापासून चौथीपर्यंत ओवळीत वास्तव्य होते. प्राथमिक शाळेतच कबड्डीचे शिक्षण मिळाले व ओवळीत सुरु झालेला कबड्डीचा इतिहास आज दिग्विजयी होऊन सार्‍या राज्याचे नेतृत्व करीत आहे. गावात होणार्‍या स्पर्धा मग त्या कोणत्याही असो, त्यामध्ये आपण भाग घेतला. संघ मैदानात आला की स्फुरण चढे व नंतर प्रत्यक्षात मैदानावरच प्रवेश केला आणि मैदान हे त्याच्याआयुष्याचं सार बनून गेले. दहावीपर्यंतचे शिक्षण घेताना उत्कृ ष्ट खेळाडू हीच ओळख कायम राहिली. ‘वाडीया कॉलेजमध्ये कबड्डीतून व्याप्ती वाढली. जिद्द कायम ठेवली व पुण्यातच माझ्या खेळाला प्रेरणा मिळाली. अमरज्योत क्रीडामंडळातून सुरुवात झाली. मावळंगकर खेळाडूंच्या सहवासात असतानाच शांताराम जाधव हे मला गुरुस्थानी लाभले. तेव्हापासून त्यांच्यासमवेत कबड्डीमध्ये प्रगती करीत गेलो. १९८२ ते ८७ या काळात केलेला सराव महत्वपूर्ण ठरला. महाराष्टÑ संघातून निवड झाल्यानंतर यश मिळाले व भारतीय संघातही निवड झाली. भारत विरुद्ध चीन यांच्यात झालेली स्पर्धा व त्यात भारताकडून मी केलेली पहिली चढाई व पहिला गुणही माझा होता व आम्ही सुवर्णपदक विजेते ठरलो. बिजींगमध्ये भारताचे राष्टÑगीत घुमले व खर्‍या अर्थाने मला जग जिंकल्याचा आनंद झाला’, असे तो सांगतो. ‘एशियन स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे प्रत्यक्ष युद्धसदृश्य परिस्थिती. देशप्रेमी क्रीडा रसिकांच्या पाठींब्यामुळे आक्रमकतेने या स्पर्धेतही देशाला विजय मिळवून दिला व आम्ही २६ गुणांनी जिंकला’, असे तो म्हणाले. कोकणाने कबड्डीला प्रेम दिलं. खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. तेथील वातावरणाशी जुळवून घेतले पाहिजे. मात्र आज जिद्द बाळगून ध्येय ठरवून परिश्रम घेणारे कमी खेळाडू आहेत. आज मैदानावर पहातो तेव्हा खेळाडूंचा फिटनेस दिसत नाही. मला शिकायचं आहे. मी स्वत:च पुढाकार घेणार आहे, ही जिद्द प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे त्याचे मत आहे. गावाकडचे खेळाडू शहरात येताना नव्या वाटा शोधण्यासाठी संघर्ष करावा लागेल. मात्र जगात अनेकजण यशस्वी होण्यापूर्वी अडचणीतूनच पुढे गेले आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. आयुष्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. शिंदे हे याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. कबड्डी येते. मी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. या भ्रमात रहाता कामा नये. तंत्रशुद्ध प्रशिक्षण, क्षमता वृद्धी यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे आहेत. आज अनेक खेळाडू प्रतिक्षेत आहेत. या सर्वांनाच कधी ना कधी राज्यासाठी, देशासाठी खेळायचे आहे. ते संधीच्या शोधात आहेत. आज कोकणात तरुण खेळाडू उदयाला येत आहेत. कबड्डीसाठी हे सुचिन्ह आहे. खेळता खेळता आपणही स्पर्धा भरवाव्यात, ही इच्छा मनात धरुन आपण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, किरण पावसकर यांच्या मदतीने मुंबईमध्ये स्पर्धा भरविल्या. राष्टÑीय स्पर्धा २०११ ला खेळाडूंच्या संयोजन व्यवस्थेतून पार पडला. यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. खेळात विशिष्ट टप्पा गाठल्यानंतर स्वकर्तृत्वावर समाधान मानावे लागते. चिपळूण तालुक्यात ओवळीसार ग्रामीण भागात कबड्डीचा श्रीगणेशा करुन पुणे, मुंबई, दिल्ली व परराष्टÑात या खेळाला वैभवाचे दिवस प्राप्त करुन दिले. त्यातूनच आता या क्षेत्रात नवीन कबड्डीपट्टू उतरले आहेत. खेळाडूंना नोकर्‍यांमध्ये स्थान मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. कोकणात अनेक हिरे आहेत. फक्त त्यांच्यामागे आर्थिक पाठबळ व कौतुकाची थाप मारण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे शिंदे म्हणतो.

Web Title: Conquered the crucial moment ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.