कॉँग्रेसला जिल्ह्यात नवसंजीवनीची आशा
By Admin | Updated: July 9, 2015 00:00 IST2015-07-09T00:00:47+5:302015-07-09T00:00:47+5:30
रत्नागिरी जिल्हा : शासनाविरोधात राणेंच्या नेतृत्त्वाखाली उद्या मोर्चा

कॉँग्रेसला जिल्ह्यात नवसंजीवनीची आशा
रत्नागिरी : राज्य शासन अनेक पातळ्यांवर अपयशी असून, कोकणच्या समस्यांकडेही दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत कॉँग्रेसतर्फे राज्यभरात येत्या ९ व १० जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १० जुलै रोजी हा मोर्चा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली काढला जाणार आहे. प्रदेशाध्यक्षांचेच तसे निर्देश असल्याने या मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातून कॉँग्रेसला जिल्ह्यात नवसंजिवनी मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
वर्षभरापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी कोकणातही तीच स्थिती होती. त्यानंतरच्या जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत व जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही कॉँग्रेसची पीछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील कॉँगे्रसची दीर्घकालीन सत्ता वर्षापूर्वी संपुष्टात आल्यानंतर भाजपप्रणीत सरकाविरोधात वातावरण इतक्या लवकर निर्माण होईल, असे कॉँग्रेसलाही वाटले नव्हते. फडणवीस सरकारच्या कारभाराचे शांतपणे निरीक्षण करणाऱ्या कॉँग्रेसला ही संधी चालून आली आहे. कॉँग्रेसच्याच योजना पुढे चालवणाऱ्या या सरकारने नवीन काय केले, घोटाळेच बाहेर येत आहेत, लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे आता याच मुद्द्यांवरून शासनाची कोंडी करण्यासाठी व जनतेमध्ये आपले स्थान पुन्हा भक्कम करण्यासाठी या मोर्चाचा उपयोग होणार असल्याची आशा कॉँग्रेसला वाटते आहे. त्यामुळेच प्रदेशचे जिल्हा प्रभारी शिंदे यांनी रत्नागिरीतील कॉँग्रेसच्या जिल्हा बैठकीत हीच आशा कार्यकर्त्यांमध्ये जागवली आहे. मरगळ झटकून कामाला लागा, असे निर्देशच त्यांनी दिले आहेत.
येत्या शुक्रवारी सकाळी १० वाजता कॉँग्रेस भवनकडून हा मोर्चा नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली निघणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्या अपयशाबाबत व जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे झालेले नुकसान यासारख्या महत्त्वाच्या समस्यांबाबतचे निवेदन दिले जाणार आहे.
या मोर्चाला किती उपस्थिती राहील, याबाबत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी स्पष्ट उत्तर दिले नसले तरी मोर्चाला मोठी गर्दी असेल, शक्तीप्रदर्शन होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)
राजकीय फटकेबाजी अन् प्रहार
रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात कॉँग्रेसच्या होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे करणार असल्याने यावेळी होणाऱ्या जाहीर सभांच्या वेळी राणे हे राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार प्रहार करतील, राजकीय फटकेबाजी होईल. त्यामुळे जिल्ह्यातील कॉँग्रेसचे सर्व प्रवाह या मोर्चात सहभागी होतील व त्याचा लाभ संघटनेला होईल, अशी अपेक्षा आता काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.