काँग्रेस, शहर आघाडीचा बहिष्कार
By Admin | Updated: July 30, 2014 23:47 IST2014-07-30T23:44:58+5:302014-07-30T23:47:19+5:30
चिपळूण पालिका : स्वीकृत नगरसेवक वादामुळे काँग्रेस आघाडीत फूट

काँग्रेस, शहर आघाडीचा बहिष्कार
चिपळूण : येथील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, आज (बुधवारी) झालेल्या या निवडीच्या सभेवर काँग्रेससह शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीच्या इनायत मुकादम यांची निवड करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवकपदाचा वाद शिगेला पोहोचला असून, आघाडीत बिघाडी झाली आहे.
चिपळुणात आघाडीतील वातावरण चांगलेच तापले आहे. आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली असून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील या वादाचा फटका आघाडीला बसण्याची शक्यता आहे.
चिपळूण पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी नीता शिंदे उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजेश कदम यांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी इनायत मुकादम यांचा एकमेव अर्ज आल्याचे जाहीर केले. मुकादम यांची स्वीकृतपदी निवड झाल्याचे शिंदे यांनी त्यानंतर सांगितले.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी ९ जण इच्छुक होते. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत इनायत मुकादम यांना ६ महिन्यासाठी हे पद देण्याचे ठरविण्यात आले. मात्र, हा निर्णय काँग्रेस नगरसेवकांना मान्य न झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला यापुढे पाठिंबा द्यायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच या निवडीप्रसंगी काँग्रेसचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष लियाकत शाह, पाणी पुरवठा समितीचे सभापती कबीर काद्री, संजय रेडीज यांच्यासह शहर विकास आघाडीचे नगरसेवक मोहन मिरगल, समीर जाधव, मिलिंद कापडी, पूजा गांगण, सायली काते हे नगरसेवक अनुपस्थित होते.
काँग्रेसचे नगरसेवक संजय रेडीज हे सभागृहाबाहेर होते. मात्र, ते सभागृहात आले नाहीत. काँग्रेस आणि शहर विकास आघाडीच्या या निवडणुकीतल बहिष्काराने पुन्हा एकदा चिपळूण पालिकेतील आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. (वार्ताहर)