कोरोनामुळे मंडप व्यावसायिकांवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:36 IST2021-09-14T04:36:35+5:302021-09-14T04:36:35+5:30
रत्नागिरी : कोरोनाचे पडसाद विविध क्षेत्रावर उमटले आहेत. मंडप व्यवसाय तसेच संलग्न विविध व्यवसायही यामुळे ...

कोरोनामुळे मंडप व्यावसायिकांवर संक्रांत
रत्नागिरी : कोरोनाचे पडसाद विविध क्षेत्रावर उमटले आहेत. मंडप व्यवसाय तसेच संलग्न विविध व्यवसायही यामुळे संकटात आले आहेत. कोरोनामुळे विविध गणेशोत्सव मंडळांनी उत्सव रद्द केले आहेत. विविध कार्यक्रमांना मंडळांनी फाटा देत सामाजिक उपक्रमांवर भर दिल्याने मंडप व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
लग्न, स्वागत सोहळे यासह राजकीय नेत्यांच्या सभा, दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम यामुळे मंडप व्यावसायिकांचा व्यवसाय चालतो. या व्यवसायाशी संलग्न भोजन, साऊंड सिस्टीम, फुलांची सजावट, विद्युत रोषणाईकार, बँडवाले या व्यवसायांनाही फटका बसला आहे. लग्नासाठी शासनाने परवानगी देताना काही निर्बंध शिथिल केले आहेत. मंडप व्यावसायिक सतत नवीन सजावटीसाठी आग्रही असल्याने डिसेंबर व मार्चमध्ये त्यांना दोनवेळा खरेदी करावी लागते.
जिल्ह्यात छोटेमोठे अडीच हजार मंडप व्यावसायिक आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक गणेशमूर्तींची संख्या मोजकीच असल्याने मोजक्या मंडळींना काम मिळते. परंतु, वर्षभर छोटेमोठे काम सर्वांनाच मिळते. गेल्या - दीड वर्षांत कोरोना व निर्बंधामुळे लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे.
गणेशोत्सवात मंडप व्यावसायिकांचा बऱ्यापैकी व्यवसाय होतो. परंतु, कोरोनामुळे अनेक मंडळांनी उत्सव रद्द केला आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे काहींनी गणेशमूर्ती आणून छोटेखानी धार्मिक कार्यक्रमावरच भर दिला. त्यामुळे मूर्तीसाठी छोटा मंडप टाकण्यात आला, तर काही ठिकाणी कार्यालयांच्या आवारातच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
गणेशोत्सवात व लग्न समारंभात मंडपाला चांगली मागणी असते. मात्र, गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असून, लग्नसोहळेही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत होत आहेत. त्यामुळे कामगारांना काम राहिलेले नसल्याने मंडप व संलग्न व्यवसायातील कामगारांवर संकट ओढावले आहे.
या व्यवसायातील कौशल्यपूर्ण कारागिरांना सोडून चालत नसल्याने व्यावसायिकांना त्यांना वेतन द्यावेच लागत आहे. मात्र, अन्य सहाय्यक कामगारांवर उपासमार ओढावली आहे.
मंडप व्यावसायिकांसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर असते. ते सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी अनेक व्यावसायिकांनी साहित्यासाठी गोदामे भाड्याने घेतली आहेत. गोदामासाठी वीजपुरवठा आवश्यक आहे. व्यवसायाअभावी महावितरणची विजेची बिले तसेच गोदामांचे भाडे भरावेच लागत आहे.
---------------------------
कोरोनामुळे मंडप व संलग्न व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यवसायातील गुंतवणूक अधिक आहे. परंतु, कामच नसल्याने उलाढाल ठप्प झाली आहे. व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, गोदाम भाडे, विद्युत बिले याचा भुर्दंड सोसावाच लागत आहे. शासनाकडून नियमांमध्ये अजून शिथिलता आणण्याची आवश्यकता आहे.
- ए. एस. सावंत, जिल्हाध्यक्ष, मंडप, लाईट, साऊंड, इव्हेंट आणि कॅटरर्स असोसिएशन, रत्नागिरी.