सांस्कृतिक केंद्रासंदर्भात ‘आम्ही चिपळूणकर’ एकवटले
By Admin | Updated: January 20, 2015 23:49 IST2015-01-20T23:19:22+5:302015-01-20T23:49:13+5:30
चिपळूण पालिका : दुरुस्तीचे आश्वासन हवेतच विरले

सांस्कृतिक केंद्रासंदर्भात ‘आम्ही चिपळूणकर’ एकवटले
चिपळूण : आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या कोकणातील समृध्द शहर म्हणून चिपळूणकडे पाहिले जाते. मात्र, गेली ८ ते १० वर्षे बंद पडलेले इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र दुरुस्त करुन ते रसिकांसाठी खुले करावे, या मागणीसाठी ‘आम्ही चिपळूणकर’ या संस्थेच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, राजेश कदम, महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती आदिती देशपांडे, राजेश देवळेकर, इनायत मुकादम, युवराज मोहिते, प्रकाश गजमल, रमाकांत सकपाळ, राजन इंदुलकर, प्रताप गजमल, संजीव अणेरावे, राजू जाधव, निशिकांत पोतदार, गौरव वायदंडे, सुरेश मोहिते, ए. आर. कासकर, अभिजीत काटदरे, गगनेश दळी, प्रशांत परब, डी. टी. कदम, वासंती जड्यार, वेदिका पडवळ, माया बोदाडे उपस्थित होते.
१९८५ मध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, नगर परिषद प्रशासनाने रसिकांच्या सेवेसाठी सुरु केले होते. मात्र, २००५ मध्ये आलेल्या महापुरात या केंद्राची इमारत नादुरुस्त झाली, तेव्हापासून हे केंद्र बंद आहे. त्यामुळे रसिकांना अनेक चांगल्या कार्यक्रमांपासून वंचित रहावे लागत आहे, अशी खंत व्यक्त करण्यात आली. सांस्कृतिक केंद्र दुरुस्तीबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर, या केंद्राच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी निधी मंजूर झाला आहे. केंद्र नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासन स्तरावर पाठवण्यात आला आहे. या केंद्रासाठी अंदाजे ५ कोटी रुपये खर्च होणार असून, वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून निधी खर्च करुन मार्चअखेर या केंद्राचे काम सुरु होईल, असे उपनगराध्यक्ष शाह यांनी सांगितले.
यापूर्वी डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आकाश थिएटर, ओंकार नाट्य संस्था, चौकट ग्रुप, स्वेअर थिएटर, समर्थ एंटरटेनमेंट आदी संस्थांनी नगर परिषद प्रशासनाकडे सातत्याने संपर्क केला आहे. हे केंद्र दुरुस्त करण्याबाबत नगर परिषद प्रयत्न करीत आहे, असे आश्वासन नगर परिषदेने दोन वर्षांपूर्वी दिले होते. तरीही दिंरंगाई का ? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. (वार्ताहर)
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नूतनीकरण जलद गतीने व्हावे, अशी मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडेही पत्र व्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्याकडून नगर परिषदेला योग्य ते सहकार्य मिळवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करु, असे युवराज मोहिते यांनी सांगितले.
काही वेळा चिपळूणच्या मुख्याधिकाऱ्यांकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याची खंत, गटनेते राजेश कदम यांनी व्यक्त केली. जनतेने आपणास निवडून दिले आहे, त्यांना आवश्यक त्या सेवा सुविधा कशा मिळतील, याकडे आपण गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असे रमाकांत सकपाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.