माध्यमिक शिक्षकांना संचमान्यतेची चिंता!
By Admin | Updated: October 19, 2015 23:51 IST2015-10-19T22:37:30+5:302015-10-19T23:51:02+5:30
शासनाचा निर्णय : मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता

माध्यमिक शिक्षकांना संचमान्यतेची चिंता!
सागर पाटील- टेंभ्ये--राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये काम करणारा शिक्षक सध्या मोठ्या प्रमाणात चिंतातूर दिसत आहे. दि. २१ आॅक्टोबर रोजी होणारी संचमान्यता हे चिंतेचे प्रमुख कारण असल्याचे अनेक शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. गेल्या दोन शैक्षणिक वर्षापासून प्रलंबित असणारी संचमान्यता सरल प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे करण्याचे शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. दि. २८ आॅगस्टच्या शासन निर्णयाप्रमाणे संचमान्यता करण्याचे निश्चित झाल्याने शिक्षक मोठ्या संख्येने अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
‘सरल’ प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांची माहिती आॅनलाईन करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रणालीमध्ये भरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे सन २०१५-१६ची संचमान्यता करण्यात येणार आहे. शाळेचा स्तर व संचमान्यतेचे निकष शासनस्तरावरुन दि. २८ आॅगस्टच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहेत. राज्यामध्ये इयत्ता आठवी ते दहावी या माध्यमिक शाळांचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु, शासनाने आठवीचा वर्ग माध्यमिक शाळेपासून वेगळा केल्याने या वर्गाला अध्यापन करणारा शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. माध्यमिक शाळेचा स्तर केवळ इयत्ता नववी ते दहावीइतकाच निश्चित करण्यात आला आहे. नववी अथवा दहावीच्या तुकडीमध्ये ६० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास जादा शिक्षकाचे एक पद अनुज्ञेय राहणार आहे. केवळ दोन तुकड्या असणाऱ्या शाळेतच तीन शिक्षकांना मान्यता मिळणार आहे. यामध्ये भाषा, गणित - विज्ञान व समाजशास्त्राच्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
दि. २८ आॅगस्टच्या शासन निर्णयातील जाचक अटींमुळे अनेक शिक्षक हवालदिल झाले आहेत. ग्रामीण भागातील छोट्या शाळांवर या निर्णयाचे विपरीत परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासून एखाद्या शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकाला ती शाळा सोडून जावे लागणार असल्याची शक्यता अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारांमुळे शिक्षकाला आपले कुटुंबही स्थलांतरीत करावे लागणार आहे. यामुळे संचमान्यतेची तारीख जाहीर झाल्यापासून शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
शासनाविरोधात संयुक्त आंदोलन : भारत घुले
२८ आॅगस्टचा शासननिर्णय रद्द करावा व शिक्षणविरोधी धोरणाविरोधात संस्थाचालक, महामंडळ, मुख्याध्यापक संघ, अध्यापक संघ, शिक्षकेतर संघटना व काही शिक्षक संघटना मिळून संयुक्त आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी सांगितले.
२१ तारखेला होणार राज्यात संचमान्यता.
प्रलंबित असणारी संचमान्यता सरल प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे करण्याचे निश्चित.