कृषिवनिकी संकल्पना शेतकऱ्यांना तारणार
By Admin | Updated: December 5, 2015 00:21 IST2015-12-04T22:35:14+5:302015-12-05T00:21:17+5:30
पी. के. नायर : वनसंसाधन, वातावरणातील बदलाबाबत दापोलीत राष्ट्रीय परिसंवाद

कृषिवनिकी संकल्पना शेतकऱ्यांना तारणार
दापोली : भारतातील एकंदर भौगोलिक स्थिती, वातावरण हे कृषिवनिकी क्षेत्राला अत्यंत पोषक असल्याने भारतात यापुढे कृषिवनिकीच्या माध्यमातून शेती संकल्पनांची जुनी कवाडे नव्याने उघडणे आवश्यक असल्याचे मत फ्लोरीडा युनिवर्सिटीचे ज्येष्ठ कृषिवनिकी तज्ज्ञ डॉ. पी. के. आर. नायर यांनी दापोलीत व्यक्त केले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वनशास्त्र महाविद्यालय आणि कृषी वनस्पतीशास्त्र विभाग आणि भारतीय वृक्षशास्त्रज्ञ संस्था हिमाचल प्रदेश-सोलन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या स्वामीनाथन सभागृहात आयोजित तीन दिवसीय वनसंसाधन आणि वातावरण बदल विषयावर राष्ट्रीय परिसंवादात डॉ. नायर बोलत होते.कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी सांगितले की, शेतकरी व आदिवासी यांनी त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी वने व वनांतील संसाधनांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. तरच ही संपत्ती टिकून राहील. त्यासाठी प्रत्येकानेच वनसंवर्धनाची जबाबदारी उचलली पाहिजे, असे डॉ. भट्टाचार्य म्हणाले. या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात ८ राज्यांतील १२ विद्यापीठांचे शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. यावेळी शास्त्रज्ञांच्या ५५ शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. परिसंवादात डॉ. के. एस. शर्मा, डॉ. शाम विश्वनाथ, डॉ. अजित ठाकूर, डॉ. रमेश मढव, डॉ. जितेंद्र सिंंग यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. नारखेडे, ए. डी. राणे, व्ही. एम. म्हैस्के, बी. एल. ठवरे, एम. एम. बुरोंडकर यांच्यासह सहकाऱ्यांनी परिसंवाद यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. सूत्रसंचालन व्ही. के. पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)
दापोलीत आयोजित या राष्ट्रीय परिसंवादात कृषी विषयाशी संबंधित अनेक शोधनिबंध सादर करण्यात आले. या शोधनिबंधांवर त्यानंतर चर्चा करण्यात येऊन खुला परिसंवादही पार पडला.
आठ राज्यातील १२ विद्यापीठांचे शास्त्रज्ञ सहभागी.
शास्त्रज्ञांच्या ५५ शोधनिबंधांचे सादरीकरण.
विविध विषयांवर मार्गदर्शन.