संगणक परिचालकांची दिवाळी मानधनविना
By Admin | Updated: October 26, 2014 23:24 IST2014-10-26T21:45:49+5:302014-10-26T23:24:31+5:30
जिल्ह्यातील ६६६ संगणक परिचालकांची दिवाळी मागील महिन्याचे मानधन न मिळाल्याने कडू

संगणक परिचालकांची दिवाळी मानधनविना
रत्नागिरी : जिल्ह्यातील ६६६ संगणक परिचालकांची दिवाळी मागील महिन्याचे मानधन न मिळाल्याने कडू झाली आहे. महाआॅनलाईनचा कारभार सुधारून या परिचालकांना ‘अच्छे दिन’ येणार कधी? असा प्रश्न विचारला जात आहे.
जिल्ह्यात सात तालुके मिळून ६६६ संगणक परिचालक ग्रामपंचायतीत काम करीत आहेत. कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत सुदरीक यांनी या परिचालकांना दिवाळीपूर्वी मानधन देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. आॅगस्ट, सप्टेंबर या महिन्यांचे मानधन देण्यात आलेले नाही. परिचालकांनी त्यांच्या प्रलंबीत मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मे महिन्यात सादर केले होते. त्यावर जिल्हा समन्वयक व विभागीय प्रमुखांनी आश्वासने दिली होती. मात्र ती आश्वासने हवेत विरल्याने संगणक परिचालकांचा प्रश्न अद्याप ऐरणीवरच आहे.चार हजार १०० एवढे मानधन ठरलेले असताना अनेकांच्या खात्यावर त्या महिन्यात निम्म्याहुन कमी मानधन जमा झाले होते. काही परिचालकांचे जुलै महिन्याचे मानधन कंपनीने केले नाही. या मानधनाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चार महिन्यापासून या परिचालकांना मानधन न मिळाल्यामुळे दिवाळी गेली. आता पुढील काळात परिचालकांना वेळेवर मानधन दिले जाईल का? हा प्रश्न असतानाच दिलेल्या निवेदनावर कोणतीही ठाम भूमिका घेत नसल्याबद्दल संबंधित परिचालकांनी कंपनीविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)