शासनाच्या नियमांचे पालन; मात्र, सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST2021-04-09T04:33:46+5:302021-04-09T04:33:46+5:30
रत्नागिरी : शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी व्यापाऱ्यांनी सध्या दुकाने बंद ठेवली असली, तरीही लाॅकडाऊनला त्यांचा तीव्र विरोध आहे. मात्र, ...

शासनाच्या नियमांचे पालन; मात्र, सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू
रत्नागिरी : शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी व्यापाऱ्यांनी सध्या दुकाने बंद ठेवली असली, तरीही लाॅकडाऊनला त्यांचा तीव्र विरोध आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार तीव्र आंदोलन न करता रविवारपर्यंत सनदशीर मार्गाने आंदोलन करून शासनापर्यंत व्यापाऱ्यांच्या समस्या व नुकसान पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या मार्च महिन्याच्या शेवटापासून लाॅकडाऊनला सुरुवात झाली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहिली. अगदी सप्टेंबरपर्यंत लाॅकडाऊन कडक होते. त्यामुळे किराणाव्यतिरिक्त अन्य दुकाने बंदच होती. त्यानंतर हळूूहळू कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर या दुकानांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, या सात-आठ महिन्यांच्या कालावधीत या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याचबरोबर दुकाने बंद राहिली, तरी घरखर्चाबरोबरच विविध बिले, हप्ते भरावे लागत असल्याने ते कुठून भरणार, हा यक्ष प्रश्न या व्यापाऱ्यांसमोर उभा होता.
त्यातच विविध व्यावसायिकांचा माल दुकानात पडून राहिला. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे विविध वस्तूंचे, कपड्यांचे विक्रेते यांचा माल खराब झाला. त्यामुळे दुहेरी आर्थिक संकटात व्यापारी अडकले. या कालावधीत हे व्यापारी अनेक समस्यांच्या गर्तेत सापडले होते.
त्यानंतर साधारणत: सप्टेंबर-ऑक्टोबरच्यासुमारास ही दुकाने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. त्यानंतर दोन तीन महिने झाल्यानंतर व्यवसाय पुन्हा उभारी घेत असतानाच आता मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच शासनाने लाॅकडाऊनला सुरुवात केली आहे.
सोमवारपासून जिल्ह्यात अत्यावश्यक दुकाने, औषधे दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस लाॅकडाऊन राहणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे. पुन्हा व्यवसायावर गदा आल्याने जिल्हाभरातील व्यापाऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दुकाने बंद केली तरीही त्यावर निषेधाचे फलक लावले. जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितल्या.
मात्र, हा शासनाचा निर्णय असल्याने रविवारपर्यंत नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचा मान राखत व्यापाऱ्यांनी रविवारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला, तरीही या कालावधीत सनदशीर मार्गाने शासनापर्यंत समस्या पोहोचविल्या जाणार आहेत.
दरम्यान, गुरुवारी सकाळी रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी दुचाकीवरून शहरात फिरून लाॅकडाऊनप्रकरणी निषेध व्यक्त केला.
चौकटसाठी
जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग यांची रत्नागिरी तालुका व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमाेर मांडण्यात आल्या. यावेळी डाॅ. गर्ग यांनी या पदाधिकाऱ्यांना लाॅकडाऊनचा निर्णय राज्यस्तरावरील आहे. मात्र, रविवारनंतर काहीतरी चांगला मार्ग निघेल, असा आशावाद व्यक्त करून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू नये, असे आवाहन केले. त्याचा आदर राखत संघटनेने रविवारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या कालावधीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे एसएमएसद्वारे समस्या पोहोचविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष निखिल देसाई यांनी दिली.