सीटी स्कॅनसाठीची इमारत लवकर पूर्ण करा : योगेश कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST2021-06-01T04:24:25+5:302021-06-01T04:24:25+5:30
खेड : तालुक्यातील रुग्णांना सीटी स्कॅनसारखी अत्यावश्यक सेवा विनाविलंब आणि कमीत कमी खर्चात मिळावी यासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाशेजारील जागेवर ...

सीटी स्कॅनसाठीची इमारत लवकर पूर्ण करा : योगेश कदम
खेड : तालुक्यातील रुग्णांना सीटी स्कॅनसारखी अत्यावश्यक सेवा विनाविलंब आणि कमीत कमी खर्चात मिळावी यासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाशेजारील जागेवर इमारत उभी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ हे काम जितक्या लवकर पूर्ण करता येईल तेवढे लवकर पूर्ण करावे, अशा सूचना आमदार योगेश कदम यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी यांना केल्या आहेत.
तालुक्यातील जनतेसाठी चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने आमदार योगेश कदम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन, ब्लड बँक, डायलेसीस यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत सीटी स्कॅनला अतिशय महत्त्व असल्याने ही सुविधा प्राधान्याने सुरू करण्यात येणार आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथील शासकीय जागेवर सीटी स्कॅनसाठी इमारत उभी करता यावी यासाठी आमदार कदम यांनी आरोग्य मंत्रालयाकडे मागणी केली होती. त्यानुसार या ठिकाणी इमारत बांधण्याची परवानगी आणि आवश्यक असलेल्या निधीला मंजुरी मिळताच सार्वजनिक बांधकाम उपविभागाने या ठिकाणी १३ बाय १३ मीटरची इमारत बांधण्यास सुरुवात करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात या इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आता ही इमारत पूर्णत्वाला जात असून, जूनच्या अखेरीस ही इमारत पूर्ण करून शासनाकडे हस्तांतरित केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. इमारतीचे काम वेळेत पूर्ण होण्याबरोबरच ते दर्जेदार व्हावे यासाठी आमदार योगेश कदम हे स्वत: या कामावर लक्ष ठेवून आहेत. या इमारतीचे काम पूर्ण होताच सीटी स्कॅन मशीन खरेदी केली जाणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
---------------------------
खेड येथील सीटी स्कॅनसाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीची आमदार योगेश कदम यांनी पाहणी केली़