कंपनीचे सांडपाणी उघड्यावर
By Admin | Updated: November 1, 2015 00:09 IST2015-10-31T22:59:47+5:302015-11-01T00:09:24+5:30
लोटे औद्योगिक वसाहत : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

कंपनीचे सांडपाणी उघड्यावर
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे - परशुराम औद्योगिक क्षेत्रातील आवाशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रंग उत्पादन करणारी दीपक केमटेक्स प्रा. लि. या कंपनीचे घातक रासायनिक सांडपाणी दिवसाढवळ्या कंपनीच्या गटारातून पाईपद्वारे सोडत असताना माजी शिवसेना शाखाप्रमुख व माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन हरीश्चंद्र आंब्रे यांनी रंगेहाथ पकडले व त्याचे छायाचित्रही घेतले. मात्र, कंपनीचे व्यवस्थापन त्याची जबाबदारी घेत नसल्याचे आंब्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
याबाबत कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर ए. एस. महाडिक यांची भेट घेतली असता त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मागील वीस ते पंचवीस वर्षापासून ही कंपनी आवाशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रंग उत्पादन करण्याचे काम करत आहे. यापूर्वीच्या व्यवस्थापनाच्या कामगिरीबद्दल मला जास्त माहिती नाही. मात्र, मागील आठ महिन्यांपासून मी इथे फॅक्टरी मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. हे करत असताना कंपनीचे सर्व कामकाजामध्ये मी आमूलाग्र बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असून, कंपनीतीलच काही कर्मचारी माझ्यावर राजकीय दबाव आणू पाहत आहेत, असे सांगितले. कंपनीला बदनाम करण्याचे त्यांचे षडयंत्र असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.
संबंधीत विषारी सांडपाणी घटनेबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता असे काहीच घडले नसल्याचे महाडिक यांनी ठामपणे सांगितले. यावर्षीचा बावीस टन घनगाळ आम्ही मुंबई वेस्ट मॅनेजमेंट तळोजा, नवी मुंबई येथे पाठवला आहे. अमोनियम सल्फेट, सोडीयम सल्फेट यासारखे सात प्रकारचे उत्पादन आम्ही कच्चा माल म्हणून वापरतो व त्यापासून (अइठकठए- डाईज-५०) हे पक्का माल म्हणून तयार केले जाते.
उत्पादनासाठी दररोज पंधराशे लिटर पाणी आम्ही वापरतो व त्यातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार आम्ही ईटीपी कार्यान्वित केला आहे. अधिकाधिक बदल घडवून कंपनीचे बदनाम झालेले नाव मला पुसून टाकायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
याउलट माजी शाखाप्रमुख सचिन आंब्रे यांच्या म्हणण्यानुसार या कंपनीत कोणतीही रासायनिक सांडपाणी सोडण्याची वा प्रक्रिया करण्याची योग्य व्यवस्था नसून, बांधण्यात आलेली ईटीपी ही टढउइ च्या नियमाच्या धोरणाबाहेर आहे. त्यामुळे दररोज रात्रीच्यावेळी ही कंपनी आपले सांडपाणी उघड्यावर सोडत असून, ग्रामपंचायतीने गावात मारलेल्या बोअरवेल व नैसर्गिक विहिरी यामुळे प्रदूषित होत आहेत, असे सांगितले. (वार्ताहर)
सचिन आंब्रे : कोणतीही प्रक्रिया नाही
कंपनीत कोणतीही रासायनिक सांडपाणी सोडण्याची किंवा प्रक्रिया करण्याची योग्य व्यवस्था नाही. कंपनीत बांधण्यात आलेली ईटीपी ही एमपीसीबीच्या नियमाच्या धोरणाबाहेर आहे. त्यामुळे दररोज ही कंपनी रात्रीच्यावेळी उघड्यावर पाणी सोडत आहे. यामुळे ग्रामपंचायतीने गावात मारलेल्या बोअरवेल व नैसर्गिक विहिरी निकामी ठरत आहेत. कोणताही घनगाळ मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला पाठवलेला नाही. घनगाळ कंपनीच्या आवारातच जमिनीत गाडला जात आहे. हे पुराव्यानिशी सिद्धी करून दाखवले जाईल. प्रदूषण मंडळाने तत्काळ या कंपनीच्या आवाराची पाहणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.