खेडमध्ये रंगत वाढणार

By Admin | Updated: April 17, 2015 00:10 IST2015-04-16T22:04:55+5:302015-04-17T00:10:00+5:30

ग्रामपंचायत निवडणूक : इच्छुकांचे मनसुबे धुळीला

The color of the village will increase | खेडमध्ये रंगत वाढणार

खेडमध्ये रंगत वाढणार

खेड : श्रीकांत चाळके--खेड तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींंच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत पार पडली़ यातील ५८ ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यामुळे अनेक गाव पुढाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे, तर काहींंना लॉटरी लागली आहे
तालुक्यातील लोटे, आवाशी व भरणे या मोठ्या ग्रामपंचायतींसह जामगे, भडगाव, चिंचघर आणि पोयनार या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीची लढाई होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २४ ग्र्रामपंचायती बिनविरोध निवडून झाल्या आहेत. तसेच १० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीमध्ये ४ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता ६९ ग्रामपंचायतींमध्ये सेना आणि राष्ट्रवादीमध्ये सरळ लढत होणार आहे. आता गावपॅनलदेखील मैदानात उतरल्याने या निवडणुका सेना राष्ट्रवादी काँग्रेसला सोप्या राहिल्या नाहीत. तालुक्यातील सर्वाधिक उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये लोटे, आवाशी, भरणे या ग्रामपंचायतींची गणना केली जाते. त्यामुळे अर्थातच सरपंचपदासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, या तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून राहिलेल्या गाव पुढाऱ्यांचा पत्ता आपोआप कट झाला आहे. आता तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १३१८ उमेदवार रिंगणात आहेत.
सध्याच्या परिस्थितीत भरणे ग्रामपंचायतीमध्ये मनसेची सत्ता आहे. लोटे आणि आवाशी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. आताच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भरणे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती होऊन कोणत्याही स्थितीत सेना आणि मनसेचा सरपंच करण्याचा इरादा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांची भरणे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याची मनीषा धुळीस मिळणार आहे. तसेच आवाशी आणि लोटे ग्रामपंचायतीमध्ये सातत्याने शिवसेनेची एकहाती सत्ता असल्याने यंदाही सेनेची सत्ता आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार संजय कदम मात्र या प्रतिष्ठेच्या लढाईत यश पदरात पाडून घेतात का? हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, बिजघर, कुंभाड, आष्टी, आंजणी, मुसाड, कुरवळ, जावळी, पोसरे बुद्रुक, साखर, चोरवणे, सापिर्ली, काडवली, चिरणी, जामगे, आयनी, होडखाड, मेठे, कासई, कावळे, तळवटखेड या सार्वत्रिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत, तर बहिरवली, सवणस खुर्द आणि आस्तान या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. सुसेरी प्रभाग क्ऱ १, वडगाव प्रभाग क्र. २, रजवेल प्रभाग क्र. १, चौगुले मोहल्ला प्रभाग क्र. २ व ३, अलसुरे प्रभाग क्र. २, खोपी प्रभाग क्र. २ व बहिरवली प्रभाग क्र. २ या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
खेड तालुक्यातील दयाळ, कुळवंडी, कळंबणी खुर्द, सवेणी, ऐनवरे, घेरासाळगड, आंबवली, वरवली, हुबरी, नांदिवली, शिरगाव, शेल्डी, गुणदे, शीव, बुद्रुक, लवेल, दाभीळ, आवाशी, बोरज, सात्वीनगाव, लोटे, तळवटपाल, वावे तर्फ खेड, धामणंद, आंबडस, धामणदेवी, सोनगाव, हेदली, मुरडे, आंबये, चाकाळे, शीवतर, चिंचघर, तिसे, साखरोली, पोयनार, फुरूस, सुकदर, धामणी, भरणे, वेरळ, शिरवली, उधळे, बुद्रुक, कसबानात, तुळशी खुर्द, बोरघर, खवटी, कशेडी, तळे, मोहाने, जैतापूर, किंजळे तर्फ नातू, शिंंगरी, कर्जी, कोरेगाव, मोरवंडे, पन्हाळजे, माणी, मिर्ले, कोतवली, केळणे, भडगाव, कर्टेल ग्रामपंचायतींसाठी आता निवडणूक होणार आहे. तालुक्यात राष्ट्रवादी, शिवसेना व गावविकास पॅनेल यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे.
सद्यस्थितीत बिनविरोध निवडून आलेल्या २४ पैकी २0 ग्रामपंचायती शिवसेना पॅनलच्या आहेत. यामुळे आता तरी सेनेचेच वर्चस्व राहिले आहे. तीन ग्रामपंचायतींमध्ये सेना आणि मनसेने युती केल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बिकट असल्याचे बोलले जात आहे. आमदार कदम, भास्कर जाधव व मंत्री रामदास कदम या तिघांचेही या निवडणुकांवर लक्ष राहणार आहे. आतापासूनच व्यूहरचना आखण्यात येत आहे.


तालुक्यात प्रथमच तिरंगी लढत
खेड तालुक्यातील ंग्रामपंचायतींच्या निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी, शिवसेना व काही ठिकाणी गाव विकास पॅनल यांच्यात लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. खेड मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीचे असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे वर्चस्व
कायम ठेवण्यासाठी प्रयत्न
सुरू आहेत. मात्र, ग्रामीण
भागात शिवसेनेने या
सर्वांना आव्हान दिल्याचे दिसत आहे.

खेड तालुक्यात यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच चुरस.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या कदमांना आव्हान.
लोटे, आवाशी, भरणे ग्रामपंचायतींवर लक्ष केंद्रीत.
८७ पैकी २४ ग्रामपंचायती बिनविरोध.
६९ ग्रामपंचायतीत शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात चुरस.
भरणे ग्रामपंचायतीत काय होणार याबद्दल उत्सुकता.
पोटनिवडणुकाही बिनविरोध.

Web Title: The color of the village will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.