कोसळलेल्या दरडीची तब्बल पंधरा दिवसांनी दखल
By Admin | Updated: August 5, 2014 00:11 IST2014-08-04T23:13:10+5:302014-08-05T00:11:31+5:30
घटनेची माहिती तहसीलदार कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षात नसल्याने अनेकांनी आश्चर्य

कोसळलेल्या दरडीची तब्बल पंधरा दिवसांनी दखल
खेड : तालुक्यातील अठरागाव धवडे बांदरी विभागातील कांदोशी सुतारवाडी येथील दरड कोसळल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी तेथील धोकादायक परिस्थितीची तहसीलदार प्रकाश संकपाळ आणि प्रांताधिकारी यांनी संयुक्तरित्या पाहणी केली. दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत येथील नायब तहसीलदारांची सोमवारी सायंकाळी भेट घेऊन कांदोशी प्रकरणाबाबत जाब विचारला. तब्बल पंधरा दिवसांनंतर हा प्रकार उघड झाला आहे.
दि. १५ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या कांदोशी सुतारवाडी येथील ५०० मीटर उंचीवर असलेली दरड कोसळली होती. मातीमिश्रित असलेली ही दरड तेथील काही ग्रामस्थांच्या घरात घुसली होती़ मात्र, या घटनेची माहिती तहसीलदार कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षात नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. ही दरड कोसळल्याने तेथील ८ घरांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
प्रशासनाने याकामी उपाययोजना करावी, अशी मागणीही या ग्रामस्थांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रकाश संकपाळ आणि प्रांताधिकारी जयकृष्ण फड यांनी संयुक्तरित्या तेथील दरडीची आणि धोकादायक स्थितीची पाहणी केली आहे़ याबाबत संकपाळ यांनी येथील धोकादायक असलेल्या ३ घरांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ‘मनसे’चे विभागीय संघटक वैभव खेडेकर यांच्यासह मनसेचे उपजिल्हाप्रमुख विश्वास मुधोळे, वैजश सागवेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर चिखले, तालुकाप्रमुख शरद शिर्के तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार रवींद्र वाळके यांची भेट घेऊन प्रशासनाच्या तयारीबाबत माहिती घेतली़ शिवाय पुणे जिल्ह्यातील ‘माळीण’सारखे प्रकरण उद्भवू नये, याकरिता प्रशासनाने उपाययोजना करावी, असे वैभव खेडेकर यांनी सुचवले. यावेळी वाळके यांनी परिस्थितीकडे प्रशासन गंभीरतेने पाहत असून, गावातील सरपंच, पोलीसपाटील आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून तातडीने निर्णय घेणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)