तटरक्षक दलातर्फे ‘आझादी का अमृतमहोत्सव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST2021-08-15T04:32:31+5:302021-08-15T04:32:31+5:30
रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दल देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा ...

तटरक्षक दलातर्फे ‘आझादी का अमृतमहोत्सव’
रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दल देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा करीत आहे. उत्सवांची मालिका सुरू ठेवत येथील तटरक्षक अवस्थानतर्फे शनिवारी सकाळी परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
यावेळी तटरक्षक अवस्थानचे सर्व अधिकारी, सैनिक, असैनिक कर्मचारी आणि स्थानिक लोक हे वृक्षरोपण कार्यक्रमात सहभागी झाले. गुलमोहोर, सोनचाफा, पेरू, बांबू, सागवान, बेल, बदाम, स्पॅथोडिया आणि कडुनिंब अशी एकूण ७५ रोपे भारतीय तटरक्षक अवस्थानच्या रत्नागिरी कार्यालयाच्या परिसरात आणि भोवताली लावण्यात आली.
तटरक्षक स्टेशन कमांडर, उपमहानिरीक्षक दुष्यंत कुमार यांनी उपस्थितांना निसर्गाचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि वनीकरणाचे महत्त्व सांगितले. झाडे वादळाच्या पाण्याच्या प्रवाहाचे प्रमाणदेखील कमी करतात, ज्यामुळे आपल्या जलमार्गांमधील धूप आणि प्रदूषण कमी होते आणि पुराचे परिणाम कमी होतात आणि भूस्खलन टाळता येते, अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी झाडे आणि खत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाचे जिल्हा वन अधिकारी स्नेहलता पाटील आणि वनरक्षक नीलेश कुंभार यांनी उपलब्ध करून दिले होते. कोरोना संसर्गाच्या खबरदारीचे सर्व उपाय कार्यक्रमादरम्यान घेण्यात आले.
भारतीय तटरक्षक अवस्थानने याआधी आझादी का अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा आणि समुदाय संवाद कार्यक्रम आयोजित केला होता.