रिफायनरीसाठी मुख्यमंत्री बारसूचा विचार करतील : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:27+5:302021-08-23T04:33:27+5:30

राजापूर : नाणार कदापि नाही, मात्र रिफायनरीसाठी मुख्यमंत्री बारसूचा विचार करतील. त्यासाठी आपली रिफायनरी प्रकल्पाची मागणी जशीच्या तशी मुख्यमंत्री ...

CM to consider bar for refinery: Vinayak Raut | रिफायनरीसाठी मुख्यमंत्री बारसूचा विचार करतील : विनायक राऊत

रिफायनरीसाठी मुख्यमंत्री बारसूचा विचार करतील : विनायक राऊत

राजापूर : नाणार कदापि नाही, मात्र रिफायनरीसाठी मुख्यमंत्री बारसूचा विचार करतील. त्यासाठी आपली रिफायनरी प्रकल्पाची मागणी जशीच्या तशी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहाेचवू, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी समर्थक शिष्टमंडळाला राजापूर येथे दिली. या वेळी बारसू, सोलगाव भागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रिफायनरीबाबत खासदार राऊत यांनी दिलेल्या आश्वासनामुळे शिवसेनेकडून रिफायनरीचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.

राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव, नाटे दशक्राेशीतील शेकडो ग्रामस्थांनी राजापुरातील डॉक्टर, वकील, व्यापारी, आंबा बागायतदार, मच्छीमार यांच्या सोबतीने खासदार विनायक राऊत यांची राजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी भेट घेतली. या वेळी आमदार राजन साळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर उपस्थित होते. या भेटीदरम्यान रिफायनरी समर्थक समन्वय समितीचे ॲड. शशिकांत सुतार यांनी बारसू, सोलगाव परिसरात रिफायनरी उभी करण्याबाबतचे निवेदन दिले.

अपुरा रोजगार, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, कोविडनंतरची उद्भवलेली परिस्थिती, व्यवसायवृद्धी, गावातील तरुणांची लक्षणीयरीत्या कमी होत जाणारी संख्या, आंबा बागायतदारांच्या व्यथा, मच्छीमार, महिला बचतगटांच्या समस्या व त्यांच्या आर्थिक वृद्धीचे उपाय अशा अनेक समस्या खासदारांपुढे मांडल्या. रिफायनरीसारखा प्रकल्प आल्यास या सर्व समस्यांचे निराकरण होईल या हेतूने हा रिफायनरी प्रकल्प बारसू, सोलगाव, नाटे परिसरात व्हावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. समर्थकांची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे जशीच्या तशी मांडण्यात येईल. मुख्यमंत्री यावर लवकरच याेग्य ताे निर्णय घेतील, असे खासदार राऊत यांनी या वेळी सांगितले.

बारसू सोलगाव भागात हा प्रकल्प आल्यास एकही घर अथवा मंदिराचे विस्थापनही होत नाही ही बाब संबंधितांकडून प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आली. प्रकल्पाविषयी असलेल्या प्रदूषणाच्या अफवांची माहिती घेऊन संबंधित ग्रामस्थांनी त्याचे योग्य व्यक्तींकडून निराकरण करून घेतले आहे, याचीही माहिती या वेळी शिष्टमंडळातर्फे देण्यात आली.

या बैठकीला रिफायनरी समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार, नगराध्यक्ष जमीर खलिफे, बागायतदार हनिफ काजी, धोपेश्वर सरपंच दत्ताराम करंबेळकर, सोलगाव माजी सरपंच भाई पाटील, गोवळ येथील गौरव परांजपे, भाजपचे तालुका संपर्कप्रमुख सुरज पेडणेकर, सोलगाव ग्रामपंचायत सदस्य दीक्षा गुरव व रामचंद्र गुरव, बचतगट प्रतिनिधी व शिवसेना महिला संघटक मनाली करजवकर, पंचायत समिती सदस्य उन्नती वाघरे, नाटे माजी सरपंच संजय बांदकर, सरपंच योगिता बांदकर, राजू बांदकर, महेश कोठारकर, सुबोध आंबोळकर, श्रुतिका बांदकर, सचिन बांदकर, युवासेना उपविभाग प्रमुख दुष्यंत पाथरे, माजी विभागप्रमुख डॉ. सुनील राणे, उपविभागप्रमुख संतोष चव्हाण, कोदवली विभागप्रमुख संतोष हातणकर, पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव, राष्ट्रवादी युवक तालुकाप्रमुख मनोहर गुरव, सोलगावचे ग्रामस्थ राजाराम गुरव, देवाचे गोठणे येथील ग्रामस्थ विनायक दीक्षित, माजी सरपंच प्राची शिर्के, ॲड. यशवंत कावतकर उपस्थित होते.

-----------------------------

नाणारबाबतचे निवेदन स्वीकारलेच नाही

नाणार येथे रिफायनरी प्रकल्प हाेण्यासाठी एक शिष्टमंडळ खासदार विनायक राऊत यांना निवेदन देण्यासाठी आले हाेते. त्या वेळी खासदार राऊत यांनी या शिष्टमंडळाला भेट नाकारत नाणार हा विषय संपलेला आहे, तेथे प्रकल्प आता हाेणार नाही, असे सांगून शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले नाही.

Web Title: CM to consider bar for refinery: Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.