दादर पॅसेंजरमध्ये अस्वच्छतेचा कळस
By Admin | Updated: April 19, 2017 13:12 IST2017-04-19T13:12:29+5:302017-04-19T13:12:29+5:30
बेसीनमध्येही घाणीचे साम्राज्य, प्रवाशांमधून संताप

दादर पॅसेंजरमध्ये अस्वच्छतेचा कळस
आॅनलाईन लोकमत
संगमेश्वर (जि. रत्नागिरी), दि. १९ : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दादर - रत्नागिरी पॅसेंजरमधील शौचालयाच्या अनेक खिडक्या तुटलेल्या असून, बेसीनमध्येही घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
दादर - रत्नागिरी पॅसेंजर ही नियमित धावणारी गाडी कोकणी प्रवाशांसाठी वरदान ठरलेली आहे. नेहमीच प्रवाशांनी लगडलेली रेल्वे सर्वसामान्य प्रवाशांसाठी फायदेशीर आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रत्नागिरीहून रात्रीच्या वेळेस मुंबईच्या दिशेने जाणारी आणखी एक पॅसेंजर गाडी सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशी असा तिकीट दर असल्यामुळे वर्षभर ही गाडी हाऊस फुल्ल चालते. साहजिकच याचा फायदा कोकण रेल्वेला होतो.
असे असताना सध्या या पॅसेंजरमधील शौचालयाच्या काही खिडक्या तुटल्या असून, अनेक खिडक्या गायब आहेत. काही खिडक्या शौचालयाच्या भांड्यावर आडव्या टाकण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच शौचालयातील काही बेसीन व दरवाजाजवळील बेसीन सध्यस्थितीला अस्वच्छ असलेली पाहावयास मिळत आहेत. ही बेसीन अस्वच्छतेने अक्षरश: माखलेली असल्याने बेसीनमध्ये प्रवाशांना तोंड धुण्याचीही इच्छा होत नाही.
बेसीन अस्वच्छ असल्याने या बेसीनजवळ गेल्यास प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर गाडीमधील दोन्ही सीटच्या मधील भागात व सीटवर बसल्यानंतर पाय ठेवण्याच्या भागामध्येही मोठ्या प्रमाणात कचरा व टरफले साठलेली असतात. याचाही त्रास प्रवाशांना होत आहे.
या सर्व समस्यांमुळे प्रवाशांमध्ये सध्या कमालीची नाराजी असून, प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे कमी म्हणून की काय या गाडीला क्राँसिंगच्या नावाखाली सतत रखडवत ठेवले जाते, अशी प्रवाशांची तक्रार आहे. ही गाडी कधीही वेळेत पोहोचत नाही. त्यामुळे या सगळ्या समस्यांनी प्रवासी मात्र हैराण झाला आहे. या समस्यांकडे कोकण रेल्वे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन या समस्या कायमच्या दूर कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)