जमिनींची नोंद क्लिकवर
By Admin | Updated: January 7, 2015 23:58 IST2015-01-07T22:23:27+5:302015-01-07T23:58:03+5:30
अंमलबजावणी : कामात पारदर्शकता पण...

जमिनींची नोंद क्लिकवर
देव्हारे : सातबारा, आठ (अ) व फेरफार आॅनलाईन दिले जाणार असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना आता कागदपत्रांसाठी सेतू कार्यालयामध्ये जावे लागणार आहे़ १ जानेवारीपासून शासनाने हा नवीन फतवा जारी केला आहे. सर्व तलाठी कार्यालयांबाहेर तशा सूचना लावण्यात आल्या आहेत़ त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मात्र नाहक त्रास होणार आहे़ आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार हस्तलिखीत कागदपत्र देणे बंद करण्यात आले आहे. आजपर्यंत सातबाराची संपूर्ण नोंद ही संगणकावर अपडेट केलेली नसल्याचे चित्र आहे. मात्र, हे काम अपूर्ण असताना शासनाने सातबारा उतारे आॅनलाईन देण्याची घोषण केली आहे. शेतकरी आपल्या काही महत्त्वाच्या कामासाठी तलाठी कार्यालयामधे जाऊन सातबारा काढत असतात़ त्यातही एकाच तलाठ्याकडे दोन ते तीन तलाठी सजा असल्याने, सातबारा मिळण्यास मोठी अडचण निर्माण होत असे. त्यामुळे ज्या दिवशी तलाठी ज्या सजेत येत असत त्यादिवशी सातबारासाठी तलाठी कार्यालयात मोठ्या रांगा लागत असत. ही स्थिती आता पाहायला मिळणार नाही. मात्र, सध्याच्या शासकीय निर्णयानुसार आवश्यकतेनुसार एका सातबारासाठी खर्च करून व जादा पैसे मोजून तालुक्याला जावे लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आता अच्छे दिन ते कोणते? असा प्रश्न विचारत आहेत़ (वार्ताहर)