चिपळूण : प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकाने कर्मचाऱ्यांच्या पगार बिलात लाखोंचा घोळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार चिपळूण तालुक्यातील वहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला आहे. पगारापोटी निधीची ऑनलाईन मागणी करताना त्याने स्वतःच्याच पगारापोटी खोटी मागणी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लिपिक दुशांत तिरमारे याला जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे. शुक्रवारी (दि. २१) जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन तपासणी व सखोल चौकशी करणार आहेत.संबंधित लिपिक हा कर्मचाऱ्यांच्या पगाराची खोटी बिले सादर करून भ्रष्टाचार करत होता. पगार बिल सादर करताना नियमित रक्कम भरणा करण्यात येत होती. मात्र, ऑनलाईन भरताना रक्कम वाढवून भरली जात होती. मागील काही महिन्यांपासून हा भ्रष्टाचार सुरू असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पगार बिलांची तपासणी करताना ही बाब उघड झाली. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली. चौकशीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. त्यामुळे गुरुवारी जिल्हा परिषद प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या लिपिकास निलंबित करण्याचा निर्णय घेतला.लिपिकाने स्वतःच्याच पगारापोटी खोटी मागणी ऑनलाईन पद्धतीने केली होती. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनातील पैसे त्याने काढलेले नाहीत. त्याची अधिक चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात जिल्ह्यातील आणखी काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संबंधित लिपिकाचे निलंबन करताना अन्य कुठल्या कर्मचाऱ्याचा सहभाग आहे का, याचीही खातरजमा केली जात आहे.
लिपिकाने घातला पगारात लाखोंचा घोळ, पगारापोटी खोटी मागणी केल्याचे आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 18:13 IST