सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छताच

By Admin | Updated: January 2, 2016 08:29 IST2016-01-01T21:01:56+5:302016-01-02T08:29:24+5:30

घाणीचे साम्राज्य : देवरुखसह संगमेश्वरात प्रसाधनगृहाची वानवा; निर्मल शौचालय नावापुरतेच

Cleanliness in public bathrooms | सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छताच

सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छताच

देवरूख : देवरूख शहरामध्ये सार्वजनिक प्रसाधनगृहाची तशी वानवाच आहे. मात्र, अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छता कायमच दिसून येत आहे. या सार्वजनिक प्रसाधनगृहांकडे दुर्लक्ष होत असल्याने साफसफाई अभावी घाणीचे साम्राज्य वाढून दुर्गंधीच मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे सार्वजनिक प्रसाधनगृहे ही घाणीचेच आगर बनत आहेत.
संगमेश्वर तालुक्याचा विचार करता तालुक्यात देवरुख आणि संगमेश्वर ही दोन शहरे येतात. मध्यवर्ती ठिकाणी, महामार्गालगत तसेच बाजारपेठ, विविध कार्यालये व महाविद्यालये याठिकाणी केंद्रीत झालेली पहावयास मिळतात. या ठिकाणी प्रवाशांचा ओघ नेहमीच वाढता असतो.
देवरूखसारख्या शहरात केवळ दोनच सार्वजनिक प्रसाधनगृहे आहेत. त्यातील एक नव्याने बांधण्यात आलेले देवरुख बसस्थानकातील तर दुसरे देवरुख तहसील कार्यालयानजीक असणारे निर्मल शौचालय अशी दोन प्रसाधनगृहे आहेत. देवरुख पंचायत समिती परिसरात असलेले प्रसाधनगृह हे अस्वच्छ आणि प्रचंड दुर्गंधी येणारे आहे. देवरुख शहराचा विकास होत आहे. देवरुख हे तालुक्याचे महत्वाचे ठिकाण आणि सर्वच शासकीय कार्यालये, दवाखाने, बँका आणि विविध व्यावसायिक कोर्सेस चालवणारी महाविद्यालये याच परिसरात आहेत. तसेच बाजारपेठ, आठवडाबाजार देखील याठिकाणी भरतो. देवरुख शहरात येणाऱ्या जनतेची संख्याही लक्षणीय आहे. या साऱ्याचा विचार करता देवरुखमध्ये प्रसाधनगृहाची वानवाच आहे. तसेच असलेल्या प्रसाधनगृहांचा विचार केला तर स्वच्छतेबाबत पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. या प्रसाधनगृहातील घाणीच्या साम्राज्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.
देवरुख शहरात केवळ दोन सार्वजनिक प्रसाधनगृहे वापरात आहेत. पोलीस वसाहतीसाठी एक आणि काही वाड्यांमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृहे आहेत. त्यातील देवरुख बसस्थानक यथील प्रसाधनगृहाचा वापर हा प्रवासी वर्गाबरोबरच व्यापारीवर्गाकडूनही मोठ्या प्रमाणात होतो. तर दुसरीकडे तहसीलच्या बाजूला असलेले निर्मल शौचालय हे केवळ नावापुरतेच निर्मल आहे. तिथे घाणीचे साम्राज्य प्रचंड आहे. त्या प्रसाधनगृहातील सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यामुळे मोठी दुर्गंधी पसरली आहे. तसेच अंतर्गत स्वच्छता नसल्याने या ठिकाणी दगड, छोट्या बाटल्या आढळून येतात.
तहसील कार्यालयाजवळील हे प्रसाधनगृह नव्याने बांधण्यात येत असलेल्या तहसील कार्यालय इमारतीच्या दर्शनी भागामध्ये आहे. याबाबत नगरपंचायतीशी संपर्क साधला असता तहसील यंत्रणेने जर आम्हाला ती इमारत हटवण्यास सांगितले तर याबाबत कार्यवाही करावी लागेल, असे सांगितले. स्वच्छकाच्या उद्दामपणाबद्दलही काहींनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत एस. टी. प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
देवरुख शहरामध्ये सार्वजनिक शौचालयांबरोबरच विविध गृह संकुलांच्या शौचालयांचे सांडपाणी याबरोबरच हॉटेलमधील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. काही गटारेही उघडी आहेत. याकडे सामाजिक संस्थांची डोळेझाक होताना दिसत असून, नगरपंचायतीकडूनही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचेच दिसून येत आहे. याकडे नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता संबंधितांना समज देण्यात आली असून, दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात ही कारवाई होणार का? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. संगमेश्वरातही संगमेश्वर बसस्थानकाचे प्रसाधनगृह वगळता बाजारपेठेसारख्या ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह नाही. अन्य वाडीवस्त्यांवर १५ ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह आहेत. याबाबत संगमेश्वर नावडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय कदम यांच्याशी संपर्क साधला असता सार्वजनिक प्रसाधनगृह विचाराधीन असल्याचे सांगितले. मात्र, सध्या ग्रामपंचायतीकडे मोठा निधी उपलब्ध नसल्याने निधीची उपलब्धता होताच हा प्रश्न मार्गी लावण्याकडे प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले.
देवरुख शहरामध्ये ४ ठिकाणी प्रसाधनगृहे बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळताच बाजारपेठ, पोलीस वसाहत आदी ठिकाणांसह एकूण ४ ठिकाणी प्रसाधनगृहे बांधण्यात येणार असल्याची माहिती देवरुख नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नीलेश भुरवणे यांनी दिली. (प्रतिनिधी)

बसस्थानक : महिलांकडून पैसे आकारणी
देवरुख बसस्थानकाच्या प्रसाधनगृहामध्ये जाणाऱ्या महिलांकडून पैशाची आकारणी येथील स्वच्छकांकडून करण्यात येत असल्याने महिलावर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. येथे महिलांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, असा फलक लावलेला असतानाही फलकावर रुमाल अथवा पिशवी लटकवून तो झाकण्यात येतो आणि प्रत्येकी ५ रुपये आकारले जातात. याबाबत काही महिलांनी विचारणादेखील केली. मात्र, प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही.

Web Title: Cleanliness in public bathrooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.