लांजा : नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणारे कार्यक्रम लांजा नगरपंचायत हद्दीमध्ये यशस्वी ठरले आहेत. यापुढेही अधिक प्रभावी पध्दतीने विविध योजना राबविण्यात येतील, असे प्रतिपादन लांजा नगराध्यक्षा संपदा वाघधरे यांनी केले.लांजा नगरपंचायतीच्यावतीने स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींच्या सत्कार सोहळयात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष मनोहर कवचे, पाणीपुरवठा व नियोजन समितीचे सभापती दिलीप मुजावर, मुख्याधिकारी प्रसाद बोरकर, बांधकाम सभापती मानसी डाफळे यांच्यासह नगरसेवक रवींद्र कांबळे, मदन राडये, परवेश घारे, मुरलीधर निवळे, पूर्वा मुळे, वैष्णवी कुरुप, यामिनी जोईल, सुगंधा कुंभार, रुपेश गांगण उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्षा म्हणाल्या की, लांजा नगरपंचायतीला जरी उद्दिष्ट दिले असले, तरीही ज्यावेळी शहरामधील एकही नागरिक उघड्यावर शौचाला बसणार नाही, त्यावेळीच या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ झाल्याचे म्हणता येईल. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा तसेच भविष्यातील स्वच्छ व सुंदर लांजा या संकल्पनेला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नगरपंचायतीतील प्रत्येक योजना ही ग्रामस्थ व नगरपंचायतीच्या एकोप्यानेच राबविणे शक्य होत आहे, असे सांगितले.स्वच्छता व आरोग्य सभापती मनोहर कवचे यांनी सांगितले की, नवीन संकल्पना आणून स्वच्छतेच्या दृष्टीने लांजा नगरपंचायत पाऊल पुढे टाकत आहे. कचरा उचलण्यासाठी घंटागाडी सुरु करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालयाचा लाभ घेऊन लवकरात लवकर शौचालय पूर्ण केले, अशा १९ लाभार्थ्यांसह या योजनेत सहभागी ११९ लाभार्थांना गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लांजा नगरपंचायतीचे मुख्य लिपिक चंद्रकांत कुरुप, संजय गुरव, विजय गुंड्ये, अमर निर्मळे, अमोल गायकवाड, अनिल मांडवकर, सुरेश मांडवकर यांनी विशेष मेहनत घेतली. (प्रतिनिधी)
‘स्वच्छ भारत’ योजना प्रभावीपणे राबवणार
By admin | Updated: March 10, 2016 23:59 IST