नगराध्यक्षपदासाठी रत्नागिरीत चुरस

By Admin | Updated: May 27, 2014 01:03 IST2014-05-27T00:49:00+5:302014-05-27T01:03:28+5:30

रत्नागिरी नगराध्यक्षपदाची सव्वा वर्षाची दुसरी टर्म येत्या २० जूनला संपत आहे. तिसर्‍या टर्मसाठी शिवसेनेतील इच्छुकांच्या जोरबैठका सुरू आहेत

Churus in Ratnagiri for the post of city president | नगराध्यक्षपदासाठी रत्नागिरीत चुरस

नगराध्यक्षपदासाठी रत्नागिरीत चुरस

  रत्नागिरी : रत्नागिरी नगराध्यक्षपदाची सव्वा वर्षाची दुसरी टर्म येत्या २० जूनला संपत आहे. तिसर्‍या टर्मसाठी शिवसेनेतील इच्छुकांच्या जोरबैठका सुरू आहेत. सेनेतील सातजण या पदासाठी इच्छुक असून ‘अबकी बार.. कोण नगराध्यक्ष होणार,’ या चर्चेला जोर चढला आहे. सत्तेचा हा मुकुट शिवसेना पक्षप्रमुख इच्छुकांच्या यादीतील कोणत्या नगरसेवकाच्या डोक्यावर चढवितात, याकडे सर्वांचे लक्ष असून नगराध्यक्षपदाची झुंज चांगलीच रंगणार आहे. कोण कोणाला धोबीपछाड देणार? याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. अडीच वर्षांपूर्वी रत्नागिरी पालिकेत कॉँग्रेस आघाडीची सत्ता जाऊन रत्नागिरीकरांनी महायुतीला भरघोस यश देत त्यांच्याकडे पालिका सत्तेच्या चाव्या सूपुूर्द केल्या होत्या. त्यानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी शिवसेनेचे मिलींद कीर यांना नगराध्यक्षपद मिळाले होते. दुसर्‍या टर्मसाठी भाजपाचे अशोक मयेकर यांना ही संधी मिळाली. सध्या ते नगराध्यक्ष असून त्यांची सव्वा वर्षाची मुदत २० जूनला संपत आहे. महायुतीत ठरल्यानुसार मयेकर यांना आपल्या पदाचा येत्या २० जूनपूर्वी राजन्ीाामा द्यावा लागणार आहे. नगराध्यक्षपदाची चौथी सव्वा वर्षाची टर्म पुन्हा भाजपासाठी असेल. नगराध्यक्षपदाची तिसरी टर्म ही शिवसेनेची असून हे पद इतरमागास वर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे सेनेतील मिलींद कीर, उमेश शेट्ये, मधुकर घोसाळे या तीन माजी नगराध्यक्षांसह विनय मलुष्टे, रशिदा गोदड, सलिल डाफळे असे सातजण नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यातही पहिल्या टर्ममध्ये नगराध्यक्ष असलेले मिलिंद कीर व माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांच्यातच खरी चढाओढ आहे. एकाच पक्षात असूनही या दोघांमध्ये गेल्या काही काळापासून विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. नगराध्यक्ष असताना मिलिंद कीर यांनी शहर विकास आराखडा बनवून शासनाला सादर केला. पालिकेवर असलेला कर्जाचा बोजा कमी करून आपल्या कारभाराची छाप उमटवली होती. तसेच तेलीआळी नाका येथील पिंपळपार हटवून शेट्ये यांना मात दिली होती. पाच वर्षांपूर्वी नगराध्यक्ष असताना उमेश शेट्ये यांनीही रत्नागिरीतील कार्यसम्राट म्हणून ओळख निर्माण केली होती. रस्ते, रस्तादुभाजक यासह अनेक बागांची कामे त्यांनी मार्गी लावली. आता हेच दोन तगडे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी आमने-सामने येत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठीची राजकीय झुंज कमालीची रंगणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Churus in Ratnagiri for the post of city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.