चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा वाढलेला असताना आज, शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपले. अचानक आलेल्या वळीव पावसाने सर्वांची तारांबळ उडवली. या पावसामुळे आंबा बागायतदारांसह शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला होता. त्यातच अचानक वातावरणात बदल होऊन उष्माही वाढला होता. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता अचानक पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अर्धातासहून अधिक काळ पडलेल्या या पावसामुळे बाजारपेठेतील वेस मारुती मंदिर, जुना काल भैरव मंदिर परिसरातील रस्त्यावर व महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले होते.या पावसामुळे शेतकरी वर्गही धास्तावून गेला आहे. शेतात रचून ठेवलेल्या भाजवणीचे साहित्य भिजल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यातच जनावरांच्या वैरणीचाही प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय तयार झालेला आंबा उतरवण्याचे काम अनेक ठिकाणी सुरु आहे. मात्र वादळी पावसामुळे आंबा गळून पडल्याने बागायतदारांचेही मोठे नुकसान होणार आहे.
Rain: चिपळूणला वादळी पावसाने झोडपले, आंबा बागायतदारांसह शेतकरी चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 18:55 IST