चिपळूण अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: May 14, 2015 23:56 IST2015-05-14T22:33:35+5:302015-05-14T23:56:51+5:30
राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप अशा सर्वच पक्षांनी वज्रमूठ करून विद्यमान संचालकांनाच पुन्हा संधी दिल्याने सहकार पॅनेल कायम राहिले

चिपळूण अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर
चिपळूण : येथील अर्बन बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेनेही आपल्या पॅनेलमध्ये सहभागी व्हावे, यासाठी सर्वपक्षीय सहकार पॅनेलने शिवसेनेसाठी २ जागा सोडल्या आहेत. शिवसेनेने त्या मान्य केल्या आहेत. शिवसेना या पॅनेलमध्ये सहभागी झाल्याने ही निवडणूक प्रक्रिया एकतर्फी किंवा बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. अर्बन बँक निवडणूक लढविणार असल्याची घोषणा शिवसेना - भाजप युतीतर्फे करण्यात आली होती. तशा बैठकाही झाल्या होत्या. स्वतंत्र पॅनल करुन निवडणूक लढवावी, असा मतप्रवाह पुढे आला होता. परंतु, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप अशा सर्वच पक्षांनी वज्रमूठ करून विद्यमान संचालकांनाच पुन्हा संधी दिल्याने सहकार पॅनेल कायम राहिले. या पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिवसेनेनेही या पॅनेलमध्ये सहभागी व्हावे, यासाठी शिवसेनेला एक महिला व एक पुरुष संचालकपद देण्याचे ठरविण्यात आले.
सहकार पॅनेलमध्ये काँग्रेसचे संजय रेडीज, राष्ट्रवादीचे अनिल दाभोळकर, सतीश खेडेकर, दिलीप दळी, मोहन मिरगल, निहार गुढेकर, नीलेश भुरण, समीर जानवलकर, अजय खातू यांचा समावेश आहे, तर भाजपाकडून प्रशांत शिरगावकर, मंगेश तांबे यांना संधी देण्यात आली आहे. महिला प्रतिनिधी म्हणून राधिका पाथरे यांना पुन्हा संधी दिली आहे. दोन जागा शिवसेनेसाठी, तर एक जागा मुस्लिम समाजासाठी सोडण्यात आली आहे. या जागांसाठी उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल होतील.
राष्ट्रवादीच्या संधी न मिळालेल्या काही विद्यमान संचालकांनी व पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार रमेश कदम यांची आज सकाळी भेट घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आम्ही अर्ज भरतो, नंतर मागे घेतो ,असेही त्यांचे म्हणणे होते. परंतु, रमेश कदम यांनी या पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. कोणताही आततायीपणा नको. हे पॅनेल सर्वपक्षीय आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच काम होऊ दे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आपण पाहू. याबाबत नंतर चर्चा करता येईल, असे सांगून कदम यांनी त्यांची समजूत काढली आहे.
शिवसेनेने सुरुवातीला आक्रमक धोरण स्वीकारले होते. परंतु, दोन जागा मिळणार असल्याने शिवसेनेतर्फे समीर टाकळे, संदीप साडविलकर, रत्नदीप देवळेकर व राजू विखारे यांच्यापैकी एकाला, तर सुचित्रा खरे, जयश्री चितळे यांच्यापैकी एका महिलेला संधी दिली जाणार आहे. हे उमेदवार उद्या शुक्रवारी अर्ज भरणार असल्याचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी सांगितले.
चिपळूणमधील प्रमुख पक्ष एकत्र असले तरी काँग्रेसचे चंद्रकांत बाईत व त्यांचे चिरंजीव सचिन बाईत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच नगरसेवक अविनाश केळसकर हेही रिंगणात आहेत. नगरसेविका सुरेखा खेराडे या अर्ज दाखल करण्याची चर्चा आहे. त्यामुळे यांना थांबवणार कसे, हा प्रश्न आहे. यापैकी कोणी माघार घेतली नाही तर निवडणूक होईल. परंतु, चिपळूण अर्बन बँकेची ही निवडणूक सहकार पॅनेल एकहाती जिंकेल, अशी चर्चा आहे. (प्रतिनिधी)
सुचय रेडीज यांच्या नेतृत्त्वाखाली सहकार पॅनल कार्यरत आहे. शेवटी बँकेचा कारभार पारदर्शक व्हावा व तेथे चांगले उमेदवार निवडून जावेत, अशी आपली भूमिका आहे. आपल्याला जे बोलायचे आहे ते आपण उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बोलू, असे माजी आमदार रमेश कदम यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, राष्ट्रवादीचे जयंद्रथ खताते यांचे आशीर्वाद सहकार पॅनलला लाभले आहेत. अर्बन बँक हे चिपळूणचे वैभव आहे. या बँकेने ठेवीदारांचा विश्वास संपादित केला आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको म्हणून आम्ही सर्वपक्षीय सहकार पॅनल तयार केले आहे. बँकेत काम करताना अनेकवेळा कडवटपणा घ्यावा लागतो. म्हणून सहकारातील जाण असणाऱ्या लोकांना पॅनलमध्ये संधी देण्यात आली आहे, असे संजय रेडीज यांनी स्पष्ट केले.
सहकार पॅनेलमध्ये शिवसेनेसाठी दोन जागा देण्याचे ठरले आहे. त्यासाठी उमेदवार निश्चित केले आहेत. त्यांच्याशी अंतिम चर्चा करुन दोन उमेदवार देऊ, बँकेचा लौकीक कायम ठेवून विश्वास जपतानाच सामान्यांच्या अडचणी सोडवायला हव्यात. आम्ही ही तडजोड करणार असल्याचे सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी सांगितले.