चिपळूणचे रस्ते होणार सिमेंटचे
By Admin | Updated: June 21, 2014 00:10 IST2014-06-21T00:09:32+5:302014-06-21T00:10:55+5:30
हिरवा कंदील : पालकमंत्र्यांसमवेत मुंबईत चर्चा

चिपळूणचे रस्ते होणार सिमेंटचे
चिपळूण : दरवर्षी शहरातील मुख्य रस्त्यांवर दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. त्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्याचा प्रस्ताव नगर प्रशासनाने तयार केला असून या प्रस्तावास राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. या रस्त्यांसंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत मुंबई येथे गुरुवारी बैठक झाली. त्यामुळे आता शहरातील मुख्य रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत.
अखिल भारतीय साहित्य संमेलन २०१३ मध्ये चिपळूण येथे झाले. या दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. या डांबरीकरणासाठी लाखो रुपये खर्च झाला आहे. मात्र, रस्त्यावर होणारी वाहनांची वर्दळ व पडणारा पाऊस यामुळे काही महिन्यातच या रस्त्यांची पुन्हा दुरुस्ती करावी लागते. रस्ता समस्येवर कायमस्वरुपी तोडगा निघावा म्हणून शहरातील मुख्य ६ रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनविले जाणार आहेत. या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत माजी आमदार रमेश कदम, नगराध्यक्ष रिहाना बिजले, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, नगरसेवक रुक्सार अलवी आदींसह अन्य नगरसेवकांनी मुंबई येथे बैठक घेवून रस्त्यांच्या कामाबाबत चर्चा केली.
स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार असून या रस्त्यास गटार दाखविण्यात आले नसल्यामुळे याबाबत पुन्हा नगरसेवकांची बैठक घेवून याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. स्वामी मठ ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते पावर हाऊस, शिवाजी चौक ते मच्छीमार्केट, नाथ पै रंगोबा साबळे रोड, बाजारपूल ते गोवळकोट आदी रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील ५ रस्त्यांना पावसाळ्यानंतर सुरुवात होण्याची शक्यता असून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांबरोबरच गटारेही चांगल्या पद्धतीने बांधली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अन्य कामांबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. रस्त्यांसाठी मंजूर असणाऱ्या निधीतून प्रथम कामांना सुरुवात होणार आहे.
डांबरी रस्ते दरवर्षी दुरुस्त करावे लागतात. यासाठी लाखो रुपये खर्च होतात. रस्त्यांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यासाठी निधी मंजूर झाल्याने आता शहरातील मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत.