चिपळूण : तब्बल १,६००पर्यंत पोहोचलेली तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ५० टक्क्यांनी घटली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ६९४ रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तालुक्यातील रूग्णसंख्या घटल्याने येथील आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ४२ ऑक्सिजन बेड व २७ आयसीयू बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.
एप्रिल महिन्याच्या अखेरीस व मे महिन्याच्या सुुरुवातीला १,५०० ते १,६०० रुग्ण विविध कोविड केअर सेंटरमध्ये व काहीजण गृह अलगीकरणात उपचार घेत होते. आता राज्य सरकारने गृह अलगीकरणात कोणत्याही रूग्णांवर उपचार न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर त्या-त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सोयी-सुविधा पुरवून तेथेच रूग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, आता या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ६९४ जण उपचार घेत आहे. यामध्ये वहाळ फाटा येथील कोविड केअर सेंटरमध्ये ३७ तर पेढांबे येथे ४०, तर कामथे उपजिल्हा रूग्णालयासह खासगी कोविड सेंटरमध्ये एकूण १६४ जण उपचार घेत आहेत. तसेच अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १३१, कापरे २७, खरवते ६२, दादर २१, फुरूस ३४, रामपूर ५३, वहाळ ४१, शिरगाव ४९, सावर्डे १०० तर जिल्ह्याबाहेर १२ जण उपचार घेत आहेत. तालुक्यात आतापर्यंत ३२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत ८,२३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी ७७१२ जण बरे झाले आहेत.
--------------------
खेर्डी व सावर्डेत मोबाईल व्हॅनची सुविधा
सध्या तालुक्यातील खेर्डी व सावर्डे परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत येथे आरटीपीसीआर तपासणीवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी खेर्डी व सावर्डे ग्रामपंचायतीत आरटीपीसीआर मोबाईल व्हॅनची सुविधा सुरू केली आहे. यामध्ये संशयित रूग्णांबरोबर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची तपासणी केली जात आहे.
------------------------
शहरात सापडले २२ जण पॉझिटिव्ह
नगरपरिषदेच्या फिरत्या पथकामार्फत सोमवारी शहरातील बहादूरशेखनाका येथील मराठी शाळा परिसर, रेशन दुकानमधील ग्राहक, भाजी मंडई, इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्र, उक्ताड बायपास रस्ता, आदी ठिकाणी १८६ जणांची अॅॅटिजन व आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. अॅंटिजन तपासणीत ८ जण तर आरटीपीसीआर तपासणीत १४ असे २२ जण बाधित रुग्ण आढळले आहेत.