चिपळूण राष्ट्रवादीमध्ये वादावादी!
By Admin | Updated: July 15, 2016 22:35 IST2016-07-15T22:21:18+5:302016-07-15T22:35:17+5:30
कार्यकर्ते बुचकाळ्यात : रमेश कदम यांच्या मेळाव्याची संपूर्ण जिल्ह्याला उत्सुकता

चिपळूण राष्ट्रवादीमध्ये वादावादी!
चिपळूण : चिपळूण नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वेळेप्रमाणेच ये रे माझ्या मागल्या, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अंतर्गत गटबाजीमुळे हा पक्ष पोखरला गेला असून, कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांच्या वादात आता जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांचीही भर पडली आहे. त्यामुळे नेतृत्व कोणाचे स्वीकारायचे, याबाबत कार्यकर्ते बुचकाळ्यात पडले आहेत.
डिसेंबर २०११मध्ये चिपळूण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या काळात तत्कालीन नगरविकासमंत्री भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांच्यात टोकाचे वाद झाले होते. यावेळी पालकमंत्री असतानाही जाधव यांनी राष्ट्रवादीचे रमेश कदम यांच्या विरोधात शहर विकास आघाडी उभी केली होती. या निवडणुकीत रमेश कदम यांच्या राष्ट्रवादीला भरभरून यश मिळाले, तर जाधव यांना केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी मिळून माजी आमदार कदम यांनी नगर परिषदेवर सत्ता स्थापन केली. पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही याच वादाची प्रतिक्रिया उमटली आणि राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काही ठिकाणी जाधव यांचे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले.
तरीही पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता आली. जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले. पण, कदम व जाधव यांच्यातील वाद कायम राहिला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाध्यक्ष शेखर निकम उमेदवार होते. त्यांनाही जाधव व कदम गटाने अपेक्षित साथ दिली नाही. त्यामुळे निकम यांचा फारच कमी मतांनी पराभव झाला. हे शल्य निकम यांच्या उरी आहे. परंतु, पक्षवाढ याच मुद्द्यावर लक्ष ठेवणाऱ्या निकम यांनी दोन्ही गटांशी आतापर्यंत मिळतेजुळतेच घेतले आहे. पक्षाने जाधव यांना प्रभारी केल्यामुळे पक्षाचा आदेश मानून ते जाधव यांच्या कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्यात सहभागी झाले आणि त्यांनी आमदार जाधव यांचे कौतुक केले. त्यामुळे निकम - जाधव एकत्र आल्याचे चित्र समोर आले. प्रत्यक्षात हे दोघं मनाने एकत्र आलेत की नाही, याचे उत्तर काळच देईल. नगरपरिषद निवडणूक आपण पक्षाच्या माध्यमातून लढवू. अखेर पक्ष महत्त्वाचा आहे, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. या घोषणेमुळेच माजी आमदार कदम काहीसे अस्वस्थ झाले. पक्षातील आपली जागा व शहराबाहेर असलेली आपली हुकूमत कमी होते की काय, या शंकेने त्यांनी निकम यांच्यावर निशाणा साधला. पुढील निवडणूक आपल्याला लढायची नाही, असे सांगतानाच आपल्याला डावलून निकम यांना ही निवडणूक सोपी नाही, याची जाणीव करून दिली. त्याबरोबरच आपला स्वतंत्र कार्यकर्ता मेळावा घेण्याचेही जाहीर केले. खरेतर रमजान ईदनंतर हा मेळावा होणार होता. परंतु, नगराध्यक्षपदाचे आरक्षण शनिवारी असल्याने या आरक्षणानंतर कदम यांची राजकीय गणिते पक्की होणार आहेत. त्यानंतरच ते मेळाव्याची घोषणा करतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
कदम हे मूळचे काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीचे आहेत. १९७४पासून राजकारणात त्यांची पाळेमुळे घट्ट आहेत. भविष्यात त्यांना विधानसभेची निवडणूक लढवायची नसल्याने शहरावरील आपली हुकूमत कायम ठेवण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु आहे. मध्यंतरी ते शिवसेना व भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. परंतु, ही चर्चा सोशल मीडियापुरतीच मर्यादित राहिली. आपण पक्षांतर करणार नाही, असा खुलासा त्यांनी केला होता. लोकसभा निवडणुकीत शेकापला जवळ करताना आपल्याला राष्ट्रवादीच्या हायकमांडनेच आदेश दिले होते. हे कदम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सोयीसाठीच कदम यांनी शेकापमध्ये प्रवेश केला होता, हे लपून राहिलेले नाही.
जाधव - कदम वादात आता निकम आले असले तरी कदम हे स्थीतप्रज्ञ आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पुन्हा एकदा चिपळूण या राजकीय आखाड्याकडे लागले आहे. जिल्ह्याचे राजकारण चिपळूणमधून चालते. चिपळूण हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, असे बोलले जाते. परंतु, या बालेकिल्ल्यातच सध्या गटबाजीला उधाण आल्याने कदम यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. कदम यांना वगळून राष्ट्रवादीला येथे यश मिळणे अवघड आहे, याची जाणीव वरिष्ठांनाही आहे. वरिष्ठ पातळीवरूनही कदम यांना छुपा पाठिंबा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जाधव यांचे राजकारणातील पंख छाटण्यासाठी कदम यांना मोहरा केला जात आहे, अशीही चर्चा आहे. त्यामुळे एकूणच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. रमेश कदम यांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे करण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे. राष्ट्रवादीने कदम यांना विश्वासात घेतले नाही, तर कदम कोणत्याही पक्षाशी जवळीक साधून आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतील. पण, राष्ट्रवादी कदम यांना वाऱ्यावर सोडेल का? हा खरा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)
माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला दांडी मारल्याने सर्वांनीच त्यांना टीकेचे लक्ष्य केले. त्यानंतर त्यांनी लवकरच आपण मेळावा घेणार असल्याचे जाहीर करून या वादात आणखीनच भर घातली आहे. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या आणि नंतर राष्ट्रवादीत परतलेल्या रमेश कदम यांच्या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.