चिपळूण खडपोली ग्रामपंचायत उभारणार स्वतःचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:09+5:302021-05-12T04:32:09+5:30
तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत, प्रशासनाकडून पाहणी लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : खडपोली ग्रामपंचायतीने स्वतःचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय ...

चिपळूण खडपोली ग्रामपंचायत उभारणार स्वतःचे कोविड सेंटर
तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत, प्रशासनाकडून पाहणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : खडपोली ग्रामपंचायतीने स्वतःचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी येथील जिल्हा परिषद शाळा ताब्यात घेऊन तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंगळवारी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी या सेंटरची पाहणी करून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले. लवकरच येथे कोविड सेंटर सुरू होणार आहे. एखाद्या ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आपल्या गावासाठी स्वतःचे कोविड सेंटर सुरू करण्याचे हे पहिले उदाहरण ठरणार आहे.
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दररोज ५० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. शहरांपेक्षा ग्रामीण भागात संसर्ग अधिक वेगाने होत असल्याने आता प्रशासनाबरोबरच ग्रामस्थ देखील सतर्क झाले आहेत. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोकादेखील भविष्यात असल्याने आतापासूनच प्रत्येक ठिकाणी तयारी केली जात आहे. त्यामध्ये आता चिपळूण येथील खडपोली ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेऊन आदर्शवत धाडस केले आहे.
कोरोनाचा धोका ओळखता आपल्या गावात एखादे कोविड सेंटर असावे, जेणेकरून गावातील लोकांना येथेच उपचार मिळतील. या उद्देशाने खडपोली ग्रामपंचायतने कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची इमारत देखील त्यांनी मिळवली. याठिकाणी पूर्ण तयारी देखील केली आहे. तयारी पूर्ण झाल्यानंतर प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी पाहणी केली. तसेच येथे करण्यात आलेल्या सोयी-सुविधा आणि तयारीचे त्यांनी कौतुकदेखील केले.
--------------------------------
चिपळूण खडपोली ग्रामपंचायतीने तयार केलेल्या कोविड सेंटरची डॉ. ज्योती यादव यांनी पाहणी केली.