चिपळूण- गोवळकोट, कालुस्तेत वाळू साठे जप्त
By Admin | Updated: July 11, 2014 00:04 IST2014-07-10T23:54:17+5:302014-07-11T00:04:16+5:30
१५ जणांकडून ५ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल

चिपळूण- गोवळकोट, कालुस्तेत वाळू साठे जप्त
चिपळूण : पावसाळा सुरु झाल्यानंतर वाळू उत्खनन व वाहतूक बंद व्हायला हवे. परंतु, राजरोस वाळू उत्खनन व वाहतूक सुरु असल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कालुस्ते व गोवळकोट येथे बुधवारी धाड टाकून १७५ ब्रास वाळूचे साठे पकडले. १५ जणांना ५ लाख ६० हजार रुपये दंड करण्यात आला.
कालुस्ते, गोवळकोट परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरु असल्याच्या तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार बुधवारी दुपारी ३ वाजता महसूल विभागाच्या मंडल अधिकारी व तलाठी यांनी चायना गेट, गोवळकोट धक्का व कालुस्ते खुर्द जांभूळ कोंड येथे छापा टाकला. चायना गेट येथून १५० ब्रास, तर जांभूळ कोंड येथून अन्वर जबले यांची २५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. यापोटी ५ लाख ६० हजार रुपयांचा दंड व स्वामीत्वधन आकारण्यात आले. महसूल विभागाने तहसीलदार पाटील यांच्या आदेशानुसार अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कडक कारवाई सुरु केली आहे. जून महिन्यात माती, खडी व वाळूच्या २३ गाड्या पकडून ५ लाख ७४ हजार ५० रुपये दंड करण्यात आला. जुलै महिन्यात आजअखेर वाळू व खडीच्या ५ गाड्या व १७५ ब्रास वाळू साठा मिळून ६ लाख ३५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. दरम्यान, चिपळूण तालुक्यात एकाचवेळी करण्यात आलेल्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.
भरारी पथकाची केली स्थापना
उंब्रजहून मोठ्या प्रमाणावर वाळू चिपळूणमध्ये येते. याकडे निवडणूक व दैनंदिन काम यामुळे आमचे थोडे दुर्लक्ष झाले होते. परंतु, आता आम्ही त्याकडे कठोर लक्ष देणार आहोत. वाहन तपासणी व अवैध साठे जप्त करण्यासाठी आम्ही भरारी पथक स्थापन केले आहे. कारवाई अधिक कडक करणार आहोत, असे तहसीलदार वृषाली पाटील यांनी सांगितले.
५ लाख ६० हजार रुपये दंड.
जून व जुलै महिन्यातील कारवाईपोटी १२ लाख ९ हजार ५० रुपये दंड वसूल.
महसूल विभागाची धडक कारवाई.
आता उंब्रजहून येणाऱ्या वाळूला लावणार टाच.
तहसीलदार वृषाली पाटील यांनी अवलंबिले कडक धोरण.
चिपळूण तालुकाभरात केलेल्या कारवाईचे सामान्यजनांकडून स्वागत.(प्रतिनिधी)