चिपळूण -गोवळकोट पूल अखेर होणार सुरु?
By Admin | Updated: September 17, 2014 22:27 IST2014-09-17T21:19:26+5:302014-09-17T22:27:30+5:30
बहुचर्चित प्रश्नावर तोडगा

चिपळूण -गोवळकोट पूल अखेर होणार सुरु?
चिपळूण : बहुचर्चित ठरलेला व अनेक अडचणींतून प्रवास करणारा चिपळूण शहरातील गोवळकोट -कालुस्ते हा महत्त्वाचा पूल अखेर उद्घटनापूर्वीच तात्पुरत्या स्वरुपात येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने सुरु झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचे काम सुरु होते. भूसंपादनापासून ते अनेकांच्या विरोधातून अखेर चाळीस वर्षे प्रतीक्षेत असलेला हा वाशिष्ठी व गोवळकोट खाडी यांना तसेच अनेक गावांना जोडणारा पूल पूर्णत्त्वाकडे गेला आहे. अजूनही काही अंतिम टप्प्यातील काम बाकी असतानाच येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या पुलावरून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. गुरुवार, शुक्रवारपासून या पुलावरून काहींनी वाहने नेऊन धन्यता मानली.
मुळातच, हा पूल युतीच्या कारकिर्दीत मंजूर झाला होता. मात्र, काही तांत्रिक व भूसंपादनाच्या अडचणींमुळे त्याचे काम रखडले होते. यानंतर सर्व पक्षातील नेत्यांनी केलेला पाठपुरावा आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून अखेर हा पूल पूर्णत्त्वाकडे जाण्यास २०१४ साल उजाडले. अर्थसंकल्पीय निधीतून हा पूल झाला आहे.
शुक्रवारी येथे काहींनी एकमेकांना शुभेच्छा देऊन उत्साहाच्या अनौपचारकिरित्या या पुलावरून वाहने नेण्याचा शुभारंभ केला. मात्र, या पुलाचे अद्याप उद्घाटन केले नसल्याचे किंवा वाहतुकीस खुला झाला नसल्याचे अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात आले. केवळ काम पूर्णत्त्वाकडे आले आहे. आचारसंहिता असल्याने या पुलाचे काम झाल्याचे अद्याप जाहीर करता येत नसल्याची माहितीदेखील यावेळी देण्यात आली.
योग्यवेळी याविषयी वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी निर्णय घेऊन या पुलाविषयी माहिती स्पष्ट करतील, असेही सांगण्यात आले. हा पूल आता रहदारीस खुला होणार असल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. (प्रतिनिधी)
अनेक विकासकामे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या उद्घाटनाअभावी त्याचा वापरही केला जात नाही. मात्र, एखाद्या कामाचे उद्घाटन झाले, तर त्याचा श्रेयवाद मात्र उफाळून येतो. मग त्या कामाचे दोन-तीनदाही उद्घाटन होते. चिपळुणातील या पुलाबाबतही दुर्लक्ष झाल्याने उद्घाटन लांबले आहे. मात्र, एका पक्षाने त्याचे उद्घाटन केल्यावर त्याचाही श्रेयवाद सुरू होईल, अशी चर्चा सुरू आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुलाचे काम सुरु.
अंतिम टप्प्यातील काम बाकी असतानाच येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या पुलावरून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला सुरु.
युतीच्या काळात मिळाली मंजुरी, पूल पूर्णत्त्वास जाण्यास उजाडले २०१४ साल.
अर्थसंकल्पीय निधीतून पूल पूर्णत्त्वास.
उद्घाटनाची प्रतीक्षाच.