चिपळूण पूरमुक्तीच्या लढ्याला मिळतय बळ, सामाजिक संस्थांचा आंदोलनाला वाढता पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 01:04 PM2021-12-11T13:04:11+5:302021-12-11T13:05:17+5:30

लाल, निळ्या पूररेषेविरोधात आणि वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ उपसा करण्यासाठी चिपळूण बचाओ समितीचे पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे.

Chiplun Bachao Samiti starts five day chain hunger strike to remove silt from Vashishti and Shiv rivers | चिपळूण पूरमुक्तीच्या लढ्याला मिळतय बळ, सामाजिक संस्थांचा आंदोलनाला वाढता पाठिंबा

चिपळूण पूरमुक्तीच्या लढ्याला मिळतय बळ, सामाजिक संस्थांचा आंदोलनाला वाढता पाठिंबा

Next

संदीप बांद्रे

चिपळूण : लाल, निळ्या पूररेषेविरोधात आणि वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ उपसा करण्यासाठी चिपळूण बचाओ समितीचे पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व ग्रामपंचायत स्तरावरही जोरदार पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत ७५ हून अधिक सामाजिक संस्थांनी या समितीला पत्र देऊन शासनाविरोधातील आपला उद्रेक व्यक्त केला आहे. दिवसेंदिवस हा पाठिंबा वाढत आहे.

चिपळुणातील लाल व निळ्या पूररेषा रद्द कराव्यात, वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपसा करण्यासाठी चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरु आहे. या उपोषणाला राजकीय स्तरावर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व भाजपसह आरपीआय, मनसे यांनीही पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय शहरालगतच्या बाराहून अधिक ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आतापर्यंत ७५ हून अधिक सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

परीट समाज, मराठा समाज, ब्राह्मण सहायक संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मुस्लीम समाज, मेमन समाज, वारकरी महामंडळ विविध देवस्थाने आदींनी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आमदार शेखर निकम यांनी भेट देऊन या विषयाचा पाठपुरावा शासनस्तरावर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही या आंदाेलानाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढत असून, बाजारपेठेतील बहुतांशी व्यापारी या आंदोलनाच्या निमित्ताने सक्रिय झाले आहेत. शासनाने दखल न घेतल्याने नागरिकांचा उद्रेक हाेऊ लागला आहे. तरीही हे आंदोलन शांततेच्या मार्गाने नेण्यासाठी चिपळूण बचाओ समितीचे अरुण भोजने, सतीश कदम, बापू काणे, शिरीष काटकर, शाहनवाज शाह, समीर जानवळकर प्रयत्न करीत आहे.

गाळ काढण्यासाठी हवेत १६० कोटी

जलसंपदा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या अहवालानुसार हा संपूर्ण गाळ उपसण्यासाठी आणि नदीचे मुख मोकळे करण्यासाठी १६० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी १३४ हेक्टर जमीन आवश्यक आहे. वाशिष्ठी नदीच्या उगमापासून ते चिपळूण शहरापर्यंत एकूण २७ बेटे आहेत. बहिरवली, जगबुडी नदीजवळ ६ बेटे आहेत. धामणदेवी धक्का येथे ८ बेटे, शीरळ पंप हाऊस, मिरजोळी पंपासमोर, एन्रॉन ब्रीजच्या उजव्या बाजूला तसेच डाव्या बाजूला, पेठमाप, शिवनदी संगम, वालोपे एमआयडीसी पंप हाऊससमोर, शंकरवाडी, बहाद्दूरशेख नाका, पिंपळी, गाणेखडपोली पूल, शिरगाव-अलोरे पूल येथे २ अशी नदीपात्रात बेटे आहेत. ही सर्व बेटे हटवण्याची गरज आहे.

पहिल्या टप्प्यात साडेनऊ कोटींचा निधी

वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपसा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून साडेनऊ कोटीचा निधी देण्यात येणार असून, त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. तसा शब्द पवार यांनी चिपळूण बचाओ समितीला दिला आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक असून, आमदार शेखर निकम यांच्याकडून पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

महसूलमंत्र्यांसमवेत सोमवारी बैठक

चिपळुणातील गाळ व पूररेषेप्रश्नी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समवेत चिपळूण बचाव समितीच्या शिष्टमंडळाची १३ डिसेंबर रोजी मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत काही धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.

चिपळूण बचाओ समितीतर्फे पक्षविरहित आंदोलन सुरू आहे. चिपळूण वाचवण्यासाठी हे आंदोलन असून, एकजुटीने त्यासाठी शहर व परिसरातील नागरिक एकत्र आले आहेत. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत स्तरावरही मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या लढ्याला नक्कीच यश येईल, अशी अपेक्षा आहे. - शिरीष काटकर, चिपळूण बचाव समिती.

Web Title: Chiplun Bachao Samiti starts five day chain hunger strike to remove silt from Vashishti and Shiv rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.